![suresh dhas and dhananjay munde](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/12/suresh-dhas-and-dhananjay-munde-696x447.jpg)
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने आज खळबळ उडाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने धस-मुंडे भेट झाली. या भेटीला बावनकुळेंसह धस यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे धस यांच्यावर टीका होऊ लागली आहे तसेच दोघांमध्ये समेट तर झाला नाही ना, असा संशयही व्यक्त होऊ लागला आहे.
बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित व खंडणीच्या प्रकरणात मोक्काखाली अटकेत असलेला मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याची कुंडलीच धस यांनी पुराव्यांसह जाहीरपणे मांडली होती. मुंडे यांचीही अनेक प्रकरणे बाहेर काढली होती. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यानंतर आज धस-मुंडे भेटीचे वृत्त बाहेर येताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
मुंडेंना दोन वेळा भेटलो – सुरेश धस
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याशी एक वेळा नाही तर दोन वेळा भेट झाली अशी जाहीर कबुली पत्रकार परिषदेत दिली. धनंजय मुंडे यांची पंधरा-वीस दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी आपली सुमारे अर्धा तास भेट झाली. बावनकुळे यांनी जेवणासाठी निमंत्रण दिले होते. मी पोहोचल्यानंतर तिथे मुंडे अचानक आले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपला काहीच सहभाग नाही असे मुंडे आपल्याला त्यावेळी म्हणाले. तसेच काही मिटेल का, असेही ते म्हणाले. पण देशमुख हत्येबाबत आपण काहीही ऐकणार नाही, त्यांच्या मारेकऱयांना फाशी होईपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असे आपण मुंडेंना आणि बावनकुळेंनाही सांगितले, असा दावा धस यांनी यावेळी केला. मुंडे यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपण त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो, तीसुद्धा धावती भेट होती असेही धस म्हणाले.
मुंडे यांच्या राजीनाम्याच्या विषयावर बोलताना बावनकुळे यांनी तो सर्वस्वी अजित पवार यांचा निर्णय असल्याचे सांगितले. अजित पवार यांना ज्या दिवशी वाटेल की त्यांच्या पक्षाच्या मंत्र्याने काही चूक केली तर ते तत्काळ निर्णय घ्यायला मागेपुढे पाहणार नाहीत, असे बावनकुळे यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत सांगितले.
ही अतिशय गंभीर बाब – अंजली दमानिया
धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्याविरुद्ध रान पेटवणाऱया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धस-मुंडे भेटीबद्दल संताप व्यक्त केला आहे. हे सर्व आश्चर्यकारक असून माझ्या माहितीप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस-मुंडे या दोघांमध्ये समेट घडवून आणली, असे त्या म्हणाल्या. पण ही अतिशय गंभीर बाब असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.
हा तर मराठ्यांचा विश्वासघात – मनोज जरांगे
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मराठय़ांचा विश्वासघात केला, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिली. ते म्हणाले की, मराठय़ांनी धस यांच्यावर विश्वास टाकला होता, परंतु त्यांच्या विश्वासाचा त्यांनी घात केला. या ठिकाणी विश्वासघात शब्दही अपूर्ण आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या झाली, त्यासंदर्भातील आरोपींशी संबंध असणाऱया व्यक्तीला भेटायला जाणे म्हणजे समाजाचा विश्वास धस यांनी संपवला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. तुम्हाला मराठय़ांनी काय कमी केले, ज्यामुळे तुम्ही असा प्रकार केला, असा सवालही त्यांनी धस यांना केला. खून करणाऱयापेक्षा खुनाचा कट रचणारा जसा जास्त दोषी असतो, तसेच या प्रकरणात सुरेश धस दोषी असतील. या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तरी त्याची जबाबदारी धस यांची राहणार आहे. जे देवेंद्र फडणवीस यांनी केले नाही ते धस यांनी केले. गोड बोलून फसवणूक केली, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला.
मुंडे-धस यांची माझ्यासमोर साडेचार तास भेट – बावनकुळे
सुरेश धस यांनी या भेटीची कबुली दिली, तर भाजप प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोरा दिला. मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो. त्यांच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत, असे बावनकुळे यांनी सांगितले. दोघेही इमोशनल आहेत. दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो, असेही बावनकुळे म्हणाले.