पीक विम्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा झाला आहे. सीएससी सेंटर हे परळीचे आहेत. दुसऱ्या जिल्ह्यात विमा भरणारेही परळीचेच आहेत. हे शेतकरी नाहीत तर काही ठरावीक लोक आहेत. कृषी मंत्री नवीन आहेत. राज्यात साडेतीनशे कोटी रुपयांचा नव्हे तर पाच हजार कोटी रुपयांचा पीक विमा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. कृषी मंत्र्यांनी बोलावले तर मी सगळे पुरावे द्यायला तयार असल्याचेही ते म्हणाले.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस पीक विमा घोटाळय़ाचा पर्दाफाश केला होता. एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना शेतकऱयांसाठी होती, मात्र काही ठराविक लोकांनी त्यात अक्षरशः लूट केली आहे. बीड, धाराशीव, जालना, परभणी ते थेट नागपूरपर्यंत एक रुपयामध्ये पीक विमा भरून गलेलठ्ठ रकमा उचलण्यात आल्या आहेत. पैसे उचलणारे लोक शेतकरी नसून काही ठराविकच असल्याचा आरोपही आमदार धस यांनी केला.
सीएससी सेंटर हे परळीचे आहे आणि पीक विमा भरणारेही ते लोक परळीचेच आहेत. पीक विमा घोटाळय़ाचा अहवाल नुकताच आला असून त्यात साडेतीनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. मात्र हा घोटाळा पाच हजार कोटी रुपयांचा असल्याचा खळबळजनक गौप्यस्पह्ट या वेळी आमदार सुरेश धस यांनी केला. नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या योजनेतले बारकावे बघितले नाहीत. घोटाळा कसा झाला, कुणी केला, कुणाला किती मिळाले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. कृषी मंत्र्यांनी बोलावले तर मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे, असेही आमदार धस म्हणाले.