
शेतकरी कर्जमुक्ती आणि शक्तिपीठ महामार्गावरून भाजपचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सरकारला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा घरचा अहेर दिला. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीत देण्यासाठी घाबरता काय, डेअरिंग करा असे आव्हानच मुनगंटीवारांनी विधानसभेत दिले.
अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवरच हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता, डेअरिंग करा. कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे. कर्जमुक्तीची रक्कम 20 हजार कोटी रुपये आहे. आपण कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 2023-24 मध्ये 1 लाख 42 हजार 718 कोटी रुपये खर्च केला. 2024-25 मध्ये त्यात 16,316 कोटी रुपयांची वाढ झाली. निवृत्ती वेतनासाठी आपण 13 हजार 565 कोटी रुपये देतो. म्हणजे एका वर्षात आपण शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्तीवेतनात 29 हजार 881 कोटींची वाढ देतो. एकीकडे आपण ही वाढ देतो, तर दुसरीकडे तिजोरीत पैसे नाहीत म्हणून आपण कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाही, असा घरचा आहेर मुनगुंटीवार यांनी आपल्याच सरकारला दिला.
शक्तिपीठाऐवजी पाणंदना पैसे द्या
एकीकडे सरकार शक्तिपीठ महामार्गाचे जोरदार समर्थन करत आहे. याबाबत बोलताना मुनगुंटीवार म्हणाले, शक्तिपीठ करा, त्यासाठी 86 हजार 300 कोटी रुपये खर्च होणार सांगितले आहे. शक्तिपीठ केलाच पाहिजे, पण पहिल्यांदा महाराष्ट्रातील पाणंद रस्त्यांना पैसे द्या, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
रोजगार कोणत्या क्षेत्रात…
सरकारने दावोसवरून 15 लाख 72 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. त्यातून 16 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. पण कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार उपलब्ध होणार आहे याची माहितीच अधिकाऱ्यांकडे नसल्याची टीकाही त्यांनी केली.
माझे एकही काम बजेटमध्ये नाही
आपण मतदारसंघातील काही कामे अर्थसंकल्पात घेण्याबाबत सचिवांना पत्र दिले होते, पण आपले एकही काम घेतले नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.