भाजप आमदार राहुल कुल यांना 127 कोटींचा घोटाळा भोवणार, हायकोर्टाने जारी केली नोटीस; चौकशी बंद करण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी

पुणे येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील तब्बल 127 कोटी 31 लाखांचा घोटाळा भाजप आमदार राहुल कुल यांच्या चांगलाच अंगलट येणार आहे. या घोटाळाप्रकरणी न्यायालयाने भाजप आमदार कुल यांच्यासह कारखान्याच्या अन्य पदाधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे.

या घोटाळ्याची चौकशी बंद करण्याचे महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका नामदेव राजाराम ताकवणे यांनी दाखल केली आहे. अॅड. सूरज महामुनी व अॅड. सचिन देवकर यांच्यामार्फत दाखल झालेल्या या याचिकेवर न्या. शिवकुमार दिघे यांच्या एकल पीठासमोर सुनावणी झाली.

यावरील पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. भाजप आमदार कुल हे या कारखान्याचे चेअरमन आहेत.

संजय राऊत यांनीही केली होती चौकशीची मागणी
राहुल कुल यांनी भीमा साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा केल्याचे पत्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. मात्र मिंधे सरकारने आमदार कुल यांना क्लीन चिट दिली.

काय आहे घोटाळा…
या साखर कारखान्याचे सभासद व माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी या घोटाळय़ाची मूळ तक्रार केली आहे. संचालक मंडळाने नातलग व मित्रांच्या नावे कोटय़वधी रुपये लाटले. साखरेच्या विक्रीतही गैरप्रकार करण्यात आला, अशी माहिती अधिकारात ताकवणे यांना मिळाली. ताकवणे यांनी तक्रार करूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. अखेर ताकवणे यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात याची खासगी तक्रार दाखल केली. दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले.