रत्नपूर-गंगापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार प्रशांत बंब यांची आज तालुक्यातील सालूखेडा या गावी प्रचारादरम्यान गावकऱ्यांबरोबर चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी गावकऱ्यांनी आमदार बंब व त्यांच्या समर्थकांवर प्रश्नांची सरबत्ती करताच त्यांनी पलायन केले.
गंगापूर-रत्नपूर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब व महाआघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यामध्ये काट्याचा मुकाबला होत आहे. दोन्ही बाजूने तोडीस तोड यंत्रणा राबवली जात आहे. महाआघाडी व महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी प्रत्यक्ष प्रचारात सुरू केला असून, गावोगावी भेटी देऊन ते मतदारांना आपली भूमिका समजावून सांगत आहेत.
आज महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांनी तालुक्यातील सालूखेडा या गावाला भेट दिली. यावेळी आयोजित केलेल्या बैठकीला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार बंब यांनी आपले भाषण सुरू करताच गावातील काही महिलांनी मागील निवडणुकीमध्ये दिलेले रेल्वे आश्वासनाचे काय झाले. त्याचप्रमाणे इतर कामांविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
गावकरी आमदार बंब यांचे काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. हा गोंधळ वाढतच गेला. ज्ञानेश्वर नलावडे, सतीश दांडेकर, परसराम बारगळ, योगेश बारगळ, विकास कापसे, दिनेश कायस्थ, बंडू शिंदे, दिनेश अंभोरे, आशिष कुलकर्णी यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमदार बंब यांनी तेथून पलायन करीत दुसऱ्या गावाकडे गेले. या घटनेची दिवसभर चर्चा होती.