भाजपच्या महेश बालदी यांची आमदारकी धोक्यात, भ्रष्टाचार करून मिळवलेल्या विजयाविरोधात हायकोर्टात याचिका

ईव्हीएम घोटाळ्यासह अनैतिक मार्गाने सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या कारभारावर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच भाजप उमेदवारांनी सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप केला जात आहे. रायगडच्या उरण विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार महेश बालदी यांनीदेखील भ्रष्ट मार्गाने निवडणुकीत विजय मिळवल्याचा दावा करत त्यांच्या या निवडीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत महेश बालदी यांच्यासह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश बालदी हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी संपत्तीचा तपशील लपवला असा दावा करत उरण विधानसभा मतदारसंघातील सुधाकर पाटील यांनी याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ही याचिका उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठासमोर प्रलंबित असतानाच प्रीतम म्हात्रे यांच्या वतीने  अ‍ॅड. प्रियांका ठाकूर यांनी आमदार बालदींच्या निवडीला हायकोर्टात आव्हान दिले आहे.