विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार किसन कथोरे तालुकावासीयांना तोंड दाखवत आहेत. वाड्या-वस्त्यांवर त्यांच्या गाड्या फिरत आहेत. आता तर कथोरे यांनी एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन करून ग्रामस्थांचा विश्वासघात केला आहे. जायगावात विकासकामांचा दुसऱ्यांदा नारळ फोडणाऱ्या कथोरे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. विकासकामे न करता केवळ नारळ फोडण्याच्या ‘निवडणूक जुमला’मुळे भाजपचे सर्वत्र हसे होत आहे.
जायगावात रस्त्याचे भूमिपूजन करीत असताना गावातील तरुण विशाल देसले यांच्यासह काही ग्रामस्थांनी तुम्ही गेल्या वर्षी एक कोटीच्या निधीच्या रस्त्याचे भूमिपूजन करून नारळ फोडले होते त्याचे पुढे काय झाले, असा सवाल करताच कथोरे यांची बोलती बंद झाली. आज परत त्याच कामाचे भूमिपूजन तुम्ही कसे काय करता, असा जाब विचारल्यानंतर किसन कथोरे निरुत्तर झाले.
मंदिराची एक वीटही रचली नाही
गेल्या दहा वर्षांपासून मुरबाड तालुक्यात भाजपचा जुमला विकास सुरू आहे. धसई बाजारपेठेतील सपशेल फेल गेलेली कॅशलेस योजना, माळशेज घाटात न झालेला स्कायवॉक (काचेचा पूल), घाटात प्रेक्षक गॅलरीचे गाजर दाखवून किसन कथोरे यांनी केवळ दिशाभूल केली आहे. 8 जानेवारी 2020 ला भाजपकडून महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाकडून पाच कोटींच्या निधीतून संगमावर महादेव मंदिराचे नूतनीकरण करण्यासाठी भूमिपूजन केले. मात्र आठ महिने उलटले तरी अद्याप येथे खोदलेल्या जागेवर एक वीटही रचली नाही.