भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंची विकृती; स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले

भाजप महायुती सरकारच्या काळात राज्यात ‘लाडक्या बहिणी’ सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. आता तर सरकारमधील मंत्र्यांनीही विकृतीचा कळस गाठला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाडके मंत्री’ जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण पुन्हा चव्हाटय़ावर आले आहे. त्या महिलेची बदनामी करून त्रास दिला जात आहे. या प्रकरणी पीडित महिलेने राज्यपालांना पत्र पाठवून नालायक मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली असून 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यपालांना पाठविलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना पाठविली आहे. पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रमाने आपली व्यथा मांडली आहे. सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. 2016मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. जयकुमार गोरे यांनी 2016मध्ये अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन दहा दिवसांची जेलवारीही झाली होती.

जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई नाही

सोशल मीडियावर गोरेंकडून बदनामी सुरू आहे. याचा कुटुंबाला खूपच त्रास होत आहे, अशी व्यथा पीडितेने सातारा जिल्हाधिकाऱयांकडे मांडली असता त्यांनी पोलीस अधीक्षक संपर्क साधतील, असे सांगितले. मात्र पुढे काहीच झाले नाही याकडेही पीडितेने लक्ष वेधले आहे.

न्यायालयात लेखी माफी; मात्र पुन्हा त्रास

2016मध्ये जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितली तसेच पुन्हा त्रास देणार नाही, अशी वकिलांमार्फत हमीही दिली होती. मात्र आता महायुती सरकारमध्ये जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रीपदाचे ‘बक्षीस’ देण्यात आले आणि महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात झाली. जानेवारी 2025 पासून अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पीडितेने 2016मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली. त्यामुळे पीडितेचे नाव उघड झाले. तिची बदनामी केली गेली. 9 जानेवारी 2025 रोजी पीडित महिलेच्या घरी पत्र आले. त्यात 2016ची तक्रार होती. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे, असे पीडित महिलेने राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

दोन कोटी खंडणीची खोटी तक्रार

गोरे यांनी पीए अभिजित काळेमार्फत माझ्याविरोधात दडिवाडी पोलीस ठाण्यात दोन कोटी खंडणीची तक्रार दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीचे पुढे काय झाले हे माहीत नाही. मी खरी होते आणि आहे हेच यावरून सिद्ध होते, असेही पीडितेने म्हटले आहे.

  • मी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. काहीही दोष नसताना मला त्रास दिला जात आहे, असा आरोप पीडितेने राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. जिल्हाधिकाऱयांकडे व्यथा मांडूनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही, असे महिलेने नमूद केले.