
राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक गोत्यात आले आहेत. भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकणाऱ्या गणेश नाईक यांच्या विजयाला न्यायालयात शिवसेनेने आव्हान दिले असून हायकोर्टाने आज याचिकेची गंभीर दखल घेत गणेश नाईक यांना नोटीस बजावली आहे. इतकेच नव्हे तर पुढील सुनावणीवेळी याचिकेवर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोटाळा झाला आहे. अनेक मतदारांना वगळण्यात आले असून सत्तेच्या बळावर व भ्रष्टाचाराचा अवलंब करत ही निवडणूक गणेश नाईक यांनी जिंकल्याचा दावा करत शिवसेनेचे उमेदवार मनोहर मढवी यांनी हायकोर्टात अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी ऐरोली विधानसभेची निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असून नाईक यांना अपात्र ठरवण्यात यावे असा युक्तिवाद अॅड. असीम सरोदे यांनी केला. न्यायालयाने या युक्तिवादाची दखल घेत भाजपच्या गणेश नाईक यांना नोटीस बजावली.