दीड हजार दिलेत… 3 हजार वसूल करणार! भाजपाच्या महिला उपाध्यक्षाची लाडक्या बहिणींना दमबाजी

1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 रुपये वसूल करणार, अशी दमबाजी कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी केली. यावरून मेघाराणी जाधव यांच्यावर जोरदार टीका होत आहे. काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेवरून भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता मेघाराणी जाधव यांनी भाजपाला मत दिले नाही तर, तीन हजार रुपयांची वसुली करणार अशी धमकीच दिली आहे. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. करवीर पन्हाळा गगनबावडा येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावं लिहून घ्या. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूवा धनंजय महाडिक यांनी केले होते.