काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. भाजप सत्य सहन करू शकत नाही. त्यामुळे हा पक्ष खोट्या गोष्टी पसरवत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी शनिवारी केला. अमेरिकेत शिखांबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
मी जे बोललो, त्यात चुकीचे काय आहे? प्रत्येक शीख तसेच प्रत्येक हिंदुस्थानी कुठल्याही भीतीशिवाय आपल्या धर्माचे पालन करू शकेल, असा आपला देश होऊ नये का? नेहमीप्रमाणे आताही भाजप खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम करीत आहे. ते सत्य सहन करू शकत नाहीत. त्यामुळेच ते मला गप्प करण्याचा प्रयत्न करताहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भाजपवर केला.