
‘जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा मार्च महिन्यातील पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. भाजपच्या 12 राज्यांमधील संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे भाजपच्या नवीन अध्यक्षाच्या नावावर लवकरच मोहोर उमटण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी डझनभर नावे चर्चेत असून यापैकी कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते, याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे.
जे.पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मूदत खरे तर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच संपली होती. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. तत्पूर्वी 2023 मध्ये त्यांना जून 2024 पर्यंत मूदत वाढ देण्यात आली होती. आता यास जवळपास वर्ष होत आले तरी नवीन अध्यक्षपदाचा पाळणा हलताना दिसत नव्हता. मात्र होळीआधी नवीन अध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार हे आता निश्चित झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एवढा उशीर का?
जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ लोकसभा निवडणुकीपूर्वी संपलेला असतानाही नवीन अध्यक्षपदासाठी एवढा उशीर का होत आहे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. मात्र यास भाजपचे घटना कारणीभूत आहे. घटनेनुसार भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 50 टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका होणे आवश्यक आहे. तत्पूर्वी बूथ, मंडल आणि जिल्हा पातळीवर निवडणुका पार पडतात. सध्या 36 पैकी 12 राज्यांच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत. आणखी 6 राज्यांमध्ये ही संघटनात्मक निवडणूक होणार आहे. पुढील वर्षी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम आणि गुजारतमध्ये निवडणूक होणार आहे. त्यामुळे येथे संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पार पडेल. तर बिहारमध्ये याच वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल त्यामुळे तिथे कोणताही बदल होण्याची शक्यता तूर्तास नाही. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीदरम्यान काही राज्यांमधील अंतर्गत कलह समोर आलेला आहे. कर्नाटक, तेलंगाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये प्रदेशाध्यक्षाबाबत पक्षात एकमत नाही. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
नड्डा यांना मूदत वाढ
जे. पी. नड्डा यांची 2019 मध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती, तर जानेवारी 2020 मध्ये त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीच्या निवडणुका पार पडल्या. आता यंदाच्या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून तत्पूर्वी नवीन अध्यक्षपदाचे नावाची घोषणा केली जाईल.