विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन भाजप महायुतीला बहुमत मिळूनही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप जाहीर करता आलेले नाही. मात्र तरीही नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानात नव्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदही पदरात पडत नसल्यामुळे ‘काळजी’ वाढलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी रवाना झाले, पण गावी गेल्यावर तापाने फणफणले आहेत.
विधानसभा निवडणुकीत 288 पैकी महायुतीला 235 जागा मिळाल्या. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. पण तरीही मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. दोन दिवसांपूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही माजी उपमुख्यमंत्र्यांची सत्तास्थापनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री भाजपचा असेल असे शहा यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितल. मंत्रिमंडळ फॉर्म्युला कसा असेल आणि मंत्रिमंडळात कोणकोण असेल हे तुम्ही मुंबईत बैठक घेऊन निश्चित करा अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
शपथविधीसाठी 15 हजार पास
शपथविधीची तारीख निश्चित होताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. हा शपथविधी सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच होईल. सुरक्षेच्या मुद्दय़ावरून आझाद मैदानात सर्वांनाच प्रवेश पास दिले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. शपथविधीसाठी जवळपास 15 हजार पास तयार करण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार
सातारा मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे उद्या, रविवारी मुंबईला परतणार असल्याचे वृत्त आहे. त्यांना ताप आहे. घशाला संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चार डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत आहे. रविवारी एकनाथ शिंदे मुंबईला जाणार असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे त्यांचे फॅमिली डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी दिली.
शिंदे गट गृहखात्यावर अडला
महायुती सरकारमध्ये गृहखातं देण्याची एकनाथ शिंदे यांची मागणी फेटाळून लावल्यावरही शिंदे गटाकडून गृह खात्यासाठी दबावाचं राजकारण सुरू आहे. आमदार संजय शिरसाट नैसर्गिक तत्त्वानुसार उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद आपल्या गटाला मिळाले पाहिजे, अशी मागणी आज पुन्हा एकदा केली.
विधिमंडळ नेता निवडीसाठी भाजपची सोमवारी बैठक
भाजपच्या आमदारांची बैठक 2 डिसेंबरला दुपारी एक वाजता होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ नेत्याची निवड होईल. यासाठी नवी दिल्लीतून भाजपचे निरीक्षक येणार आहेत. 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
फडणवीसांच्या ‘प्लॅन बी’चा ताप
पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे झालेल्या बैठकीत गृहखाते द्या, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण, शहा यांनी ही मागणी फेटाळून लावली. मात्र शिंदे त्यासाठी अडून बसल्याची चर्चा आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना 105 ताप आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हा खरंच ताप आहे की फडणवीसांनी प्लॅन बी बनवून दिलेल्या तापानंतरचा राजकीय आजार आहे, अशी चर्चा आहे.
शिंदे यांनी केसरकरांना गेटवरून परत पाठवले
शिंदे गावी आल्यावर अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना ताप आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील उपचारांसाठी डॉक्टर रवाना झाले आहेत. शिंदे यांना सलाईन लावल्याचे वृत्त असून त्यांनी मोबाईल स्वीच ऑफ केला. माजी मंत्री दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दरे गावात गेले, पण शिंदे यांनी केसरकर यांनाही भेट दिली नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही त्यांनी भेट दिली नाही.