लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी भाजपचा पराभव झाला. त्यानंतर आता भाजप नेत्यांनी एनडीएतील मित्र पक्षांच्या उमेदवारांवरच याचं खापर फोडलं आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री असलेल्या धर्मवीर प्रजापित यांनी सहकारी पक्षाच्या उमेदवारांनी केलेल्या नसत्या जुमलेबाजीमुळेच पराभव झाल्याचं म्हटलं आहे. यासाठी त्यांनी सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते आणि योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर तसंच निषाद पार्टीचे नेते आणि मंत्री संजय निषाद यांच्यावर टीका केली आहे.
प्रजापित यांनी या दोन्ही मंत्र्यांवर त्यांच्या जुमलेबाजीवरून टीका केली आहे. पश्चिम ते पूर्वांचल भागात ज्या सभा आणि बैठका झाल्या त्यात मला समजलं की कार्यकर्त्यांमध्ये आधीच नाराजी पसरली होती. या दोन्ही नेत्यांचे मुलगे निवडणुकीत हरले. त्यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा आणि मग बड्या बड्या बाता कराव्यात. कारण यावेळी त्यांच्या या जुमलेबाजीमुळेच नुकसान झालं आहे, असं प्रजापित म्हणाले.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मंत्री आणि भाजप नेते सुरेश कुमार खन्ना म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेत्यांचा आत्मविश्वास अती झाला होता. त्यांना आधीच विजयी झाल्यासारखं वाटत होतं. अतिआत्मविश्वासामुळे आमच्या कमी जागा निवडून आल्या आहेत, असं खन्ना म्हणाले आहेत.