सातार्याची लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले उदयनराजे भोसले गेल्या 72 तासांपासून अमित शहांच्या भेटीसाठी ताटकळले आहेत. शहांची भेट होत नसल्याने राजे नाराज असल्याचे कळताच भाजपच्या पोटात भीतीचा गोळा उठला. जागा वाटपासाठी दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी चर्चा सोडून राजेंचा बंगला गाठला आणि त्यांची मनधरणी केली.
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत सातार्यातून संधी मिळेल अशी आशा उदयनराजे भोसले यांना होती. भाजपने त्यांना ठेंगा दाखवला. त्यामुळे नाराज झालेल्या राजेंनी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीचा वेळ मागितला. मात्र तीन दिवस उलटूनही शहांनी उदयनराजेंना भेट दिली नाही. भाजप श्रेष्ठी उदयनराजेंना भेटत नसल्याची बातमी महाराष्ट्रात पसरली. अगोदरच मराठा आरक्षणामुळे भाजप अडचणीत आहे. त्यात उदयनराजेंची अशी अवहेलना होत असल्याचे पाहून मराठा समाजाच्या नाराजीत भर पडली. त्याचा परिणाम लोकसभेच्या मतदानावर होऊ शकतो हे लक्षात येताच भाजपच्या पोटात भीतीने गोळा आला.
जागा वाटपासाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे तसेच आशिष शेलार यांनी दिल्लीत पाय ठेवताच थेट उदयनराजेंचा बंगला गाठला. भाजप नेत्यांनी उदयनराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र राजेंनी आपण सातार्याची जागा लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितल्याने या त्रिकुटाचा निरूपाय झाल्याचे वृत्त आहे.