उत्तर प्रदेशातील जौनपूर जिह्यातील एका भाजप नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी तरुणीशी ऑनलाईन निकाह केला आहे. मोबाईलवर ऑनलाईन निकाल लावल्यानंतर याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
जौनपूरमधील भाजपचे नगरसेवक तहसीन शाहीद यांनी त्यांचा मोठा मुलगा मोहम्मद अब्बास हैदर याचा निकाह लाहोरमधील पाकिस्तानी मुलगी अंदलीप जहरा हिच्यासोबत करण्याचे ठरवले होते. हा निकाह पाकिस्तानात होणार होता. त्यांनी व्हिसा मिळावा यासाठी रीतसर अर्जसुद्धा केला होता, परंतु दोन्ही देशांमध्ये असलेल्या राजकीय तणावामुळे लग्नासाठी ऐनवेळी व्हिसा मिळू शकला नाही. तसेच वधूची आई राणा यास्मिन झैदी या आजारी पडल्या. त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
ही गंभीर परिस्थिती पाहून दोन्हींकडच्या मंडळींनी वधू आणि वर यांचा ऑनलाईन निकाह लावून देण्याचे ठरवले. शुक्रवारी रात्री हैदर यांच्यासह वर पक्षाकडील मंडळी एका ठिकाणी एकत्रित येत ऑनलाईन निकाहमध्ये सहभागी झाली, तर वधूकडील मंडळी लाहोरमधून सहभागी झाली. अन् निकाह पार पडला.
दोन्ही पक्षांकडील मंडळीच्या उपस्थितीत ऑनलाईन निकाहानंतर माझ्या पत्नीला आता हिंदुस्थान सरकार व्हिसा देईल अशी अपेक्षा आहे, असे नवरदेव हैदर याने म्हटले आहे.