मिंधेंनी सहा महिन्यांसाठी मागितलं होतं मुख्यमंत्रीपद, भाजप वरिष्ठांनी साफ धुडकावली मागणी

amit shah devendra fadnavis and eknath shinde
amit shah devendra fadnavis and eknath shinde

विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून महायुतीला बहुमत मिळाले आहे. पण त्यानंतर अकरा दिवस उलटूनही महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून गोंधळ सुरू होता. मुंबई ते दिल्ली अशा वाऱ्या सुरू होत्या. मुख्यमंत्रिपदाचा हा पेच कोणामुळे आणि का वाढला हे आता समोर आले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी मिंधे अडून बसल्याने गोंधळ वाढल्याचे आता समोर आले आहे.

मिंधे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत. तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावरून हटायला तयार नव्हते. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्रिपद मागितले होते. पण क्षणाचाही विलंब न करता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नकार दिला. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल पटेल यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत 28 नोव्हेंबरला दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळावर चर्चा करताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार दिला. तसेच किमान सहा महिने तरी मुख्यमंत्रिपद द्या, अशी मागणी केली. तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यामुळे प्रशासनावर वाईट परिणाम होईल असे म्हटले. लोकसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ शिंदे यांना वचन दिले होते की विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे यांनी या वचनाची आठवण करून दिली. पण भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना आठवण करून दिली की भाजपला राज्यात 132 जागा मिळाल्या आहेत. एवढ्या जागा तुम्हाला मिळाल्या असत्या तर तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडले असते का? असा सवाल भाजप वरिष्ठांनी एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर एकनाथ शिंदे काहीच बोलू शकले नाहीत, असे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. पण देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांना नकार दिला.