मिंधे-भाजप सरकारचा भ्रष्टाचार आणि अक्षम्य हलगर्जीपणामुळे मालवण-राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असताना आता शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी निवडणुकीसाठी वापरल्याचा गंभीर प्रकारही समोर आला आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेत हा गौप्यस्फोट केला आहे. तब्बल साडेपाच कोटींच्या निधीतून वैयक्तिक गरजेसाठी राणेंनी बेमालूम अफरातफर केल्याचे वैभव नाईक म्हणाले. विशेष म्हणजे, नौसेनेचा कार्यक्रम असताना जिल्हा नियोजनमधून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असून हा पैसा खासदार राणे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्याचे नाईक म्हणाले. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरमधील इंधनासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे खर्च करण्याची ही पहिलीच घटना असून या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे आज पत्रकार परिषद घेऊन आमदार वैभव नाईक यांनी खासदार राणेंच्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केला. नाईक म्हणाले, शिल्पकार जयदीप आपटे यांना आतापर्यंत 26 लाख रुपयेच पोच झाल्याची माहिती पोलिसांना दिलेल्या जबाबात उघड झाली आहे. त्यामुळेच या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झालेलाच आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिलेल्या नौसेनेचा नौदल दिन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातील दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी नौसेना आणि जिल्हा नियोजन असे डबल पैसे खर्ची घालण्यात आले आहेत, असा आरोपही नाईक यांनी केला आहे.
विकासकामांतील भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत
जर शिल्पकार आपटेला 26 लाख रुपयेच देण्यात आले तर मग याबाबत नौसेना गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बांधकाम, सुशोभीकरण, नौसेना कार्यक्रम तसेच रेल्वे स्टेशन सुशोभीकरण यात झालेल्या भ्रष्टाचारातील पैसा राणेंनी निवडणुकीसाठी वापरल्याचे नाईक म्हणाले.
हायकोर्टात याचिका दाखल करणार
आम्ही केवळ विरोधक म्हणून आरोप करीत नाही, तर सर्व भ्रष्टाचार आणि जिल्हा नियोजनमधून खर्ची घालण्यात आलेल्या पैशाचे लेखी पुरावे आमच्याकडे आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पालकमंत्री पिंवा सत्ताधार गप्प का, असा सवालही त्यांनी केला आहे. जिल्हा नियोजनमधून खर्ची झालेले पैसे आणि भ्रष्टाचाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही नाईक म्हणाले.
पंतप्रधानांची कोट्यवधीची उड्डाणे
नौदल दिन कार्यक्रमासाठी पंतप्रधान, मंत्री, अतिमहनीय व्यक्ती, नौदल अधिकारी व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी डीव्ही कार व इतर शासकीय वाहने व हेलिकॉप्टरसाठी इंधन व्यवस्था 37 लाख 90 हजार रुपये, मान्यवरांसाठी व एसपीजी टीमसाठी निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था 25 लाख 50 हजार रुपये, मंडप व्यवस्था व अनुषंगिक बाबींसाठी दोन कोटी रुपये, बॅरिकेटिंगसाठी 1 कोटी 50 लाख रुपये खर्च करण्यात आले. शिवाय इंटरनेट/वायरलेस/टेलिफोन, पाणी पुरवठा, ओळखपत्र छपाई व इतर किरकोळ खर्च 18 लाख 50 हजार रुपये, जिल्ह्यातील व बाहेरच्या जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी येणारे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याकरिता भोजन व्यवस्था, वाहन व्यवस्था, निवास व्यवस्था व इतर आवश्यक साहित्याकरिता 1 कोटी 22 लाख 45 हजार रुपये असा एकूण 5 कोटी 54 लाख 35 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पुतळा कोसळल्यानंतर नौसेनेने याबाबतची तक्रार देणे आवश्यक होते, मात्र पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार द्यायला लावली असल्याचेही नाईक यांनी या ठिकाणी उघड केले.
हायकोर्टात याचिका दाखल करणार
आम्ही केवळ विरोधक म्हणून आरोप करीत नाही, तर सर्व भ्रष्टाचार आणि जिल्हा नियोजनमधून खर्ची घालण्यात आलेल्या पैशाचे लेखी पुरावे आमच्याकडे आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पालकमंत्री किंवा सत्ताधारी गप्प का, असा सवालही त्यांनी केला आहे. जिल्हा नियोजनमधून खर्ची झालेले पैसे आणि भ्रष्टाचाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही नाईक म्हणाले.