कंगनाची विधानं निरुपयोगी, निराधार आणि अतार्किक…! संतापलेल्या भाजपच्या प्रवक्त्यांनी दिली जळजळीत प्रतिक्रिया

kangana ranaut and jaiveer shergill

अभिनेत्री खासदार कंगना रणौतने भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. आता तर भाजपचे प्रवक्तेच कंगनावर जोरदार टीका करत आहे. त्यामुळे पक्षाचं देशासमोर हसं झाल्याची भावना राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी गुरुवारी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितलं की, मंडीच्या खासदार कंगना रणौतचे तीन शेतीविषयक कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी करणारे विधान ‘निराधार आणि अतार्किक’ आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शेरगिल म्हणाले की, कंगनाच्या ‘शीख समुदायाविरुद्ध आणि शेतकऱ्यांविरुद्धच्या सततच्या निरुपयोगी, निराधार आणि अतार्किक विधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कामाचे’ नुकसान केले.

शेरगिल पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पंजाबमधील शेतकऱ्यांशी जो ‘बंध’ तयार केला आहे तो ‘कायम’ असून आणि कंगना रणौतच्या ‘बेजबाबदार विधानांवरून त्याचा न्याय केला जाऊ नये’.

शेतकऱ्यांच्या विरोधानंतर रद्द करण्यात आलेले तीन शेतीविषयक कायदे सरकारने परत आणले पाहिजेत, असं तिने सांगितल्यानंतर मंगळवारी वाद निर्माण झाला होता.

भाजपने तिच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे आणि म्हटले आहे की त्यांना पक्षाच्या वतीने या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी सांगितले की, कंगनाचे शेतीविषयक कायद्यांवरील विधान ‘वैयक्तिक विधान’ आहे.

‘कंगना रणौतला भाजपच्या वतीने असे विधान करण्याचा अधिकार नाही आणि ते शेतीच्या विधेयकांवर भाजपचे मत नाही. आम्ही या विधानाचा निषेध करतो’, असे ते पुढे म्हणाले.

कंगना रणौतने मंगळवारी जाहीर माफी मागितली आणि ती म्हणाली, ‘मी माझे शब्द परत घेते’.