भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नव्हे; विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी कमळाबाईच्या नकली हिंदुत्वाची सालटी काढली

भगवान शंकराच्या डाव्या खांद्याच्या मागे त्रिशूळ आहे. हे त्रिशूळ अहिंसेचे प्रतीक आहे. हेच त्रिशूळ उजव्या हातात असते तर हिंसेचे प्रतीक असते, असे सांगत आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचे महत्त्व सांगताना भगवान शंकराचा फोटो दाखवला. भगवान शंकर आमची प्रेरणा आहे. गळय़ात साप धारण करणारे शंकर मृत्यूला आपल्या सोबत ठेवत असल्याचे दर्शवत असून, ते आपली साथ सत्याला असल्याचे दाखवत असल्याचे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी, घाबरू नका, घाबरवू नका असा संदेश दिला. आपल्या महापुरुषांनीही हाच संदेश दिला, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आज लोकसभेत भगवान शिव, अभय मुद्रा, इस्लाम आणि अग्निवीर यावरून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नव्हे, असे सांगत कमळाबाईच्या नकली हिंदुत्वाची सालटी काढली. राहुल गांधी यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजप चांगलाच हडबडला. यानंतर हिंदूंच्या अवमानाचा बोगस आक्षेप घेत मुद्दे भरकटवण्याचा जोरदार प्रयत्न करीत अक्षरशः गोंधळ घातला.

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर लोकसभेत आज चर्चेला सुरुवात झाली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर हल्ला चढवला. आम्ही संविधानावर होत असलेल्या हल्ल्यावर बोलल्यानंतर भाजपकडून आता वारंवार भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप हिंदुत्वाच्या नावावर देशात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. मात्र जे लोक फक्त दिखाऊपणासाठी सतत हिंदुत्वाचा उदोउदो करीत असतात त्यांच्याकडूनच हिंसा, नफरत, असत्य अशा गोष्टी केल्या जात असल्याचा आरोपही केला. राहुल गांधींनी  भाषणादरम्यान भगवान शंकराचा फोटो दाखवला. त्याकर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना अडवत नियमावली सांगितली. आम्ही सभागृहात शिवजींचे चित्रही दाखवू शकत नाही, तुम्ही मला थांबवत आहात, असे राहुल म्हणाले. माझ्याकडे आणखी चित्रे होती जी मला दाखवायची होती. यावेळी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी सभागृहात एकच गोंधळ घालत राहुल गांधी यांनी समस्त हिंदूचा अवमान केल्याचा आरोप करीत माफी मागण्याची मागणी केली.

संघाची विचारधारा देशासाठी धोकादायक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा देशासाठी धोकादायक आहे. या संघटनेने विद्यापीठे आणि एनसीईआरटीसह शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या सदस्यांची कुलगुरू आणि प्राध्यापकपदी नियुक्ती करून घुसखोरी केली आहे, असा जोरदार हल्लाबोल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे. आमच्या सर्व संस्थांवर एका संघटनेने ताबा मिळवला आहे. आरएसएस आणि भाजपने मिळून देशातील संस्थात्मक रचनाच नष्ट केली आहे, असे ते म्हणाले.

लिख के लो, गुजरातमध्ये हरवणार

यावेळी राहुल गांधी यांनी भरसभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचं आव्हान दिलं. राहुल गांधी म्हणाले, मोदीजी, यावेळी आम्ही तुम्हाला गुजरातमध्ये हरवणार. तुम्ही हवं तर लिहून घ्या, विरोधकांची इंडिया आघाडी तुम्हाला गुजरातमध्ये हरवतेय! यावेळी इंडिया आघाडीच्या विजयी जयघोषाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

महात्मा गांधी आजही जिवंत आहेत

आपले पंतप्रधान थेट परमात्म्याशी संवाद साधतात. परमात्मा मोदींशी चर्चा करतो. आपण सगळे जैविकरीत्या  जन्माला आलोय. त्यामुळे एक दिवस मृत्यू होणारच. मात्र पंतप्रधान मोदी अजैविक आहेत. त्यांनीच म्हटलेय, महात्मा गांधींचा मृत्यू झाला आणि गांधी सिनेमा आला म्हणून जगाला त्यांची ओळख झाली. सिनेमामुळे गांधी जगाला समजले, पण मी या सभागृहाला सांगू इच्छितो की, महात्मा गांधींचा मृत्यू झालेला नाही. ते आजही विचारांनी जिवंत आहेत.

काँग्रेस पक्ष ‘अभय’ मुद्रेत

माझ्याकर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ईडीने चौकशी केली. ‘इंडिया’च्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. ओबीसी-एससी-एसटीबद्दल बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतात. मात्र भगवान शिवाप्रमाणे काँग्रेस पक्ष अभय मुद्रेत आहे. मुस्लिम आणि शीख धर्मातही अभय मुद्रा असते. आपल्या धार्मिक गंथात अभय मुद्रेबाबत सांगितले आहे. पैगंबरने लिहिले आहे, घाबरू नका. गुरू नानक यांच्या चित्रामध्येही तुम्हाला अभय मुद्रा दिसेल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

अग्निवीर हे पंतप्रधानांचे ब्रेन चाइल्ड

‘अग्निवीर’ ही योजना लष्कराची नसून पंतप्रधानांची ब्रेन चाइल्ड योजना आहे, असा गौप्यस्फोटही राहुल गांधी यांनी केला. ही बाब लष्करालाही माहीत आहे. मात्र अग्निवीर ही योजना सैनिकांच्या विरोधात आहे, सैन्याच्या विरोधात आहे. याबाबतचे सत्य काय आहे हे अग्निवीरांनाही माहीत आहे. आता ज्यांना जे आवडते ते त्यांनी ठेवावे. मात्र आमची सत्ता आल्यावर आम्ही हे बदलू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विषय खूप गंभीर

राहुल गांधी यांच्या हल्ल्यावर पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्येच उभे राहिले आणि राहुल गांधींचं भाषण मध्येच थांबवत म्हणाले, ‘हा विषय खूप गंभीर आहे. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं चुकीच आहे, हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. मला संविधानाने शिकवलंय, विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे गांभीर्याने पाहायला हवं!’

राहुल गांधी काय म्हणाले…

जे लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेतात तेच लोक दिवस-रात्र हिंसा हिंसा, नफरत-नफरत, असत्य-असत्य बोलतात.

‘भाजप’ आणि ‘मोदी’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदुत्व नाही. भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही.

आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही. हिंदुत्व हा काही भाजपचा ठेका नाही.

तुम्हीच खरे हिंदू नाही आहात. कारण हिंदू धर्मात लिहिले आहे की सत्याची साथ दिली पाहिजे.