विधानसभा निवडणुकीत मतांसाठी ‘लाडकी बहीण योजने’चा गाजावाजा करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. भाजप नेत्यांनी प्रचाराची अत्यंत खालची पातळी गाठली आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली. याचे तीव्र पडसाद संगमनेर तालुक्यासह सर्वत्र उमटले. वाहनांची तोडफोड करीत जाळपोळ करण्यात आली. हजारो महिला, नागरिकांनी पोलीस स्टेशनसमोर रात्रभर ठिय्या मांडला. सुजय विखेंसह मुख्य आरोपी वसंत देशमुखवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली. अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळला.
काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेरात डॉ. जयश्री थोरात यांचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. शुक्रवारी धांदरफळ गावात याचीच पुनरावृत्ती झाली. धांदरफळ येथे सायंकाळी सुजय विखे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपचे स्थानिक पुढारी वसंत देशमुख होते. भाषणात वसंत देशमुख यांचा तोल सुटला आणि त्यांनी जयश्री थोरात व महिलांविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केली. दरम्यान, गुन्हे दाखल करू नयेत म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणला होता, असा आरोप नागरिक करत आहेत.
पोलीस स्टेशनसमोरच सभा
आज सकाळी पुन्हा संगमनेर तालुका पोलीस ठाण्यावर हजारोच्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते गोळा झाले. गावागावांतून महिला आल्या होत्या. त्या ठिकाणीच सभा घेण्यात येऊन निषेध करण्यात आला. यावेळी नगर जिल्हा पोलिसांचा, संगमनेरच्या पोलिसांचा देखील तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. महिलांचे चारित्र्यहनन करणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात येऊन त्यांना इशाराही देण्यात आला.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शिर्डी विधानसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे, हेमंत ओगले, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात, सचिन गुजर, करण ससाने, दीपाली ससाने, राहुरीचे बाळासाहेब आढाव, विश्वास मुर्तडक, आरपीआय नेते बाळासाहेब गायकवाड, राजू खरात, सचिन चौगुले, अमर कतारी, अशोक सातपुते, संजय फड यांच्यासह संगमनेर तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी युवक कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विखेंची सारवासारव
महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर सुजय विखेंनी सारवासारव केली आहे. सभेत महिलांविषयी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहेत. वसंत देशमुख यांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला; पण ते थांबले नाहीत. या भाषणानंतर जे पडसाद उमटले त्यात मला जीवे मारण्याचा कट होता, असे विखे म्हणाले.
वसंत देशमुख फरार
वसंत देशमुख यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याने निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर त्यांच्या विरोधात चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारानंतर घाबरलेल्या वसंत देशमुख फरार झाल्याचे वृत्त आहे.
असं मी काय केलंय?
काल जे घडलं, ते अतिशय वाईट आहे. तुम्ही म्हणता राजकारणात 50 टक्के आरक्षण महिलांना द्यायचं. पण जर असं बोलणारे लोपं असतील तर महिला राजकारणात येतील का, असा सवाल करीत जयश्री थोरात म्हणाल्या, मी असं काय केलं होतं, की माझ्याबद्दल एवढं वाईट बोललं पाहिजे? ज्यांनी हे वक्तव्य केले ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात. तुम्ही विरोधक आहात, पण विरोधकाला देखील एक पातळी असते. एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुमच्या मुलीच्या, तुमच्या नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलताय. ते शोभणारं नाहीय.
सुजय विखेंना तालुकाबंदीचा ठराव
संगमनेर तालुका हा सुसंस्कृत आहे. मात्र, येथे येऊन सातत्याने भडकाऊ भाषणे करून समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या आणि महिलांचा अवमान करणाऱ्या सुजय विखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तालुक्यातील कोणत्याही गावात प्रवेश दिला जाणार नाही, असा एकमुखी ठराव संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावांमधील नागरिक व महिलांनी केला आहे.
भाषण थांबवण्याचा प्रयत्न
वसंत देशमुख यांच्या वक्तव्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित महिलांनी आक्षेप घेताच सुजय विखे यांनी भाषण कसेबसे संपवून तेथून पळ काढला. देशमुख यांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी थांबवले नाही.
सभा उधळून लावली
वसंत देशमुख यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे वृत्त पसरताच सभेच्या ठिकाणी संगमनेरातील शेकडो महिलांनी धाव घेतली आणि सभा उधळून लावली. तीव्र संताप देशमुख यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होताच शुक्रवारी रात्री संगमनेर शहर आणि तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. संगमनेर शहरासह तालुक्यात तणाव निर्माण झाला. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे हजारो महिला, नागरिकांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर शनिवारी सकाळी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.