‘अचार’ लाया हूं… ‘गुलकंद’ आ गया क्या आणि ‘सर, माता का प्रसाद मिल गया क्या? भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचाराची नवी डिक्शनरी

प्रातिनिधिक फोटो

ना खाऊंगा, ना खाने दूंगा असे वचन दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर दिले होते. तरीही देशात भ्रष्टाचार सुरूच आहे. सरकारने कितीही कडक भूमिका घेतली तरी पैशाला चटावलेल्या लाचखोरांकडून नवनवीन शक्कल लढवली जात आहे. मध्य प्रदेशात नर्सिंग कॉलेज घोटाळय़ातील आरोपींनी चक्क कोडवर्ड्स वापरले. या घोटाळय़ाचा तपास करणाऱया सीबीआय अधिकाऱयांनाच त्यांनी अचार लाया हू साहब, माता का प्रशाद मिल गया क्या, गुलकंद पहुच गया क्या अशा कोडवर्डंसद्वारे लाच दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नर्सिंग प्रवेशासाठी मोठय़ा प्रमाणात लाच घेतली जाते असा दावा करत अॅड. विशाल बघेल यांनी 2022 मध्ये न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 2020-2021 या वर्षात मध्य प्रदेशात आवश्यक पायाभूत सुविधा नसतानाही डझनावारी नार्ंसग महाविद्यालये स्थापन झाल्याचे त्यांनी या याचिकेत नमूद केले होते. या प्रकरणातील गंभीरता पाहून न्यायालयाने या घोटाळय़ाचा तपास सीबीआयकडे सोपवला.

सीबीआयने घोटाळय़ाचा तपास केल्यानंतर गेल्या फेब्रुवारीमध्ये मध्य प्रदेशातील 169 नार्ंसग महाविद्यालयांना क्लीन चिट दिली होती. 18 मे रोजी सीबीआयने 23 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यात सीबीआयच्याच चार अधिकाऱयांचा समावेश होता. तसेच नार्ंसग महाविद्यालयांच्या पदाधिकाऱयांचाही समावेश होता. त्यांच्याविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला.

इन्स्पेक्शनची तारीख कळवण्यासाठी सीबीआय अधिकाऱयांनीच लाच घेतली

15 जुलै रोजी याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सीबीआयने 14 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यात सीबीआयचा माजी निरीक्षक राहुल राज, सीबीआयमध्ये नियुक्ती झालेला मध्य प्रदेशचा पोलीस अधिकारी सुशील कुमार मजोका यांच्यासह नार्ंसग महाविद्यालयांचे संचालक आणि अन्य कर्मचाऱयांचा समावेश होता. राहुल राज यांनी सीबीआयकडून 27 नार्ंसग महाविद्यालयांचे इन्स्पेक्शन कधी होणार त्याची तारीख सांगण्यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून 10 लाख रुपये लाच घेतल्याचे आरोपपत्रात नमूद होते.

महाविद्यालयांची चालबाजी,तीन दिवसांत सुविधा उभारल्या

राहुल राज यांच्याकडून सीबीआय इन्स्पेक्शनची तारीख कळताच संबंधित महाविद्यालयांनी आपल्याकडे सर्व सुविधा आहेत हे दाखवण्यासाठी प्रयोगशाळा व अन्य पायाभूत सुविधा तत्पूर्वी अवघ्या तीन दिवसांत उभारल्याचे चौकशीत आढळले. दिखाव्यासाठी या सुविधा उभारण्यात आल्या होत्या. एवढय़ा सुविधा उभारण्यासाठी अनेक वर्षे लागतात.

लाचेची रक्कम सोन्याच्या बिस्किटांमध्ये रूपांतरीत केली

आरोपी असलेल्या सीबीआय अधिकाऱयाच्या पत्नीच्या संभाषणात एका कंपनीच्या सीईओला “सर खोदियार माता का प्रसाद मिल गया क्या?’’ अशी विचारणा होत असल्याचे आढळून आले आहे. संबंधित सीईओने लाचेची रक्कम सोन्यामध्ये रूपांतरीत करून ती 100 ग्रॅम सोन्याच्या बिस्किटांमध्ये दिली, असेही सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयने या घोटाळय़ाचा तपास करून हे कोडवर्ड्स उघड केले आहेत. आरोपींमध्ये फोनवरून झालेल्या संभाषणाच्या तब्बल 658 क्लिप सीबीआयने तपासल्या. या प्रकरणातील आरोपी असलेला माजी सीबीआय निरीक्षक राहुल राज यानेच लाच स्वीकारण्यासाठी कोडवर्ड्स तयार केले होते. लाच म्हणून दिल्या जाणाऱया रकमेचा उल्लेख अचार असा केला गेला. तसेच लाच पोहोचली की नाही याची खात्री करण्यासाठी ‘गुलपंद आ गया क्या?’ असा कोडवर्ड वापरला गेला.

अचारचा एक डबा म्हणजे एक लाख रुपये

सहा नार्ंसग महाविद्यालयांचा मालक असलेल्या अन्य एका आरोपीने आपल्या एका कर्मचाऱयाला नऊ लाख रुपये देऊन उज्जैनला जायला सांगितले होते. हे पैसे राधा रमण शर्मा याला पोचवायचे होते. त्या कर्मचाऱयाने फोन करताच राधा याने सामान पाठवून दे असे सांगितले. ते सामान मिळताच राधाने जुगल किशोर शर्मा याला फोन करून अचारचे नऊ डबे मिळाले असे कळवले होते. ही नऊ लाखांची रक्कम नंतर सीबीआय अधिकारी राहुल राज याचा जयपूरमधील सहकारी धर्मपाल याच्याकडे पोहोचली होती.

गुलकंद मागायला फोन येईल, त्याला अचार द्या

काही आरोपी लाचेच्या रकमेचा उल्लेख करताना ‘सामान’, ‘नौ डिब्बे अचार’ असे म्हणत असल्याचेही त्यांच्या फोन संभाषणातून आढळून आले आहे. या प्रकरणातील आरोपी असलेला आरोग्य अधिकारी राधा रमण शर्मा याने लाच देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैसे घेऊन रतलाम ते जयपूर असा प्रवास केला होता. त्या लाचेच्या रकमेचा त्याने फोन संभाषणात अचार असा उल्लेख केला होता. राधा रमण हा याच प्रकरणातील आरोपी असलेला ग्वाल्हेरच्या भास्कर नार्ंसग महाविद्यालयाचा संचालक जुगल किशोर शर्मा याचा भाऊ आहे. राधा रमण एक मोठा लोणच्याचा बॉक्स घेऊन येतोय तो तुमच्या घरी ठेवा असे जुगलने त्याच्या एका नातेवाईकाला फोन करून सांगितले होते. गुलपंद आ गया क्या असे विचारणारा फोन येईल त्या व्यक्तीला तो बॉक्स सोपवा, असे जुगलने सांगितले होते.