मुंबईत भाजपची सत्ता; आता मराठी चालणार नाही, मारवाडीतच बोलायचं! मराठी माणसाच्या बालेकिल्ल्यात गिरगावात परप्रांतीय व्यापाऱ्याची मुजोरी

भाजप महायुतीला महाराष्ट्रात मोठं बहुमत मिळताच परप्रांतीय व्यापाऱ्यांची भाषा बदलली असून ‘मुंबईत भाजपची सत्ता आली आहे. आता मराठी चालणार नाही. मारवाडीतच बोलायचं,’ अशी मुजोरी एका मारवाडी व्यापाऱयाने मराठी महिलेवर केली. मराठी माणसाचा बालेकिल्ला असलेल्या गिरगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

गिरगाव खेतवाडीत राहणाऱया विमल म्हसकर या सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गिरगावातीलच महादेव स्टोअरमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी मातृभाषा मराठीतून दुकानदाराशी संवाद साधायला सुरुवात केली. मात्र मारवाडी दुकानदाराने त्यांना मधेच अडवत आपल्याला मराठी समजत नसल्याचे सांगत तुम्ही मराठी का बोलता, असा सवाल उद्धटपणे केला. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे तुम्ही मारवाडीतच बोलले पाहिजे, असेही त्याने दटावले. त्यामुळे विमल म्हसकर संतापल्या. त्यांनी दुकानदाराला मराठी बाणा दाखवत जाब विचारला. तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी आला आहात. त्यामुळे तुम्ही मराठीतच बोलले पाहिजे, असेही त्यांनी मारवाडी दुकानदाराला खडसावले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाजपचे सरकार आले म्हणजे आता आम्ही मराठीत बोलायचे नाही का? मुंबई भाजपची आणि मारवाडींची झाली आहे का, असा सवाल तक्रारदार महिला म्हसकर यांनी केला आहे.

व्यापाऱ्यावर कारवाई करा

मराठीला कित्येक वर्षांच्या लढय़ानंतर ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाला आहे. यासाठी शिवसेनेकडून प्रदीर्घ पाठपुरावा करण्यात आला. असे असताना अभिजात दर्जानंतरही मराठी माणसाच्या मुंबईतच मराठीची गळचेपी होत असल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत असून संबंधित मुजोर मारवाडी दुकानदाराविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

लोढा यांची सारवासारव

आपली मुंबई सर्वांची आहे, परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे, त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱया व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी एक्स पोस्ट करत मंगलप्रभात लोढा यांनी यावर सारवासारव केली. मराठीशिवाय एका ठराविक भाषेत बोलण्याची सक्ती करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विमल म्हसकर यांनी प्रथम स्थानिक भाजप कार्यकर्त्याच्या कानावर हा प्रकार घातला. मात्र त्याने याकडे सपशेल दुर्लक्ष करीत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्या लोढा यांच्याकडे गेल्या.

मंगलप्रभात लोढा मराठी लाडक्या बहिणीला म्हणाले, मी तुला ओळखत नाही!

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मी तक्रार घेऊन गेले असता तुम्हाला मी ओळखत नाही. आमच्यात भांडणे लावण्याचे काम तुम्ही का करता असे उद्धट उत्तर त्यांनी मला दिले. तुम्ही आमदार आहात. तुम्हाला आम्ही पाठिंबा दिला. मतदारसंघातील प्रत्येक नागरिक तुमचा आहे. त्यांची तक्रार सोडवण्यासाठी तुम्हाला ओळखच हवी का, असा सवाल विमल म्हसकर यांनी केला.

  • मुंबई में बीजेपी आया है. मुंबई बीजेपी का… मुंबई मारवाडी का… अब मराठी में बात नही करने का… सिर्फ मारवाडी में बात करो’, असे हा मारवाडी व्यापारी विमल यांना म्हणाला. बघ विचार कर, असे त्यांनी तीनवेळा बजावूनही त्याची मग्रुरी कायम होती.
  • मराठीचा अपमान झाला आहे. मला न्याय हवा आहे. केवळ मी नाही तर सर्व मराठी भगिनी आणि बांधवांसाठी मला न्याय हवा आहे. हा आमचा महाराष्ट्र आहे. आमचा हक्क आम्हाला हवा आहे, असे सांगत विमल यांनी संताप व्यक्त केला.