भाजप सर्वात श्रीमंत पक्ष, 88 टक्के निधी एकट्याच पक्षाला

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षावर अक्षरशः पैशांचा पाऊस पडल्याचे समोर आले आहे. भाजपला या कालावधीत सर्वाधिक तब्बल 2 हजार 243 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या, अशी माहिती निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवणाऱ्या एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोव्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालातून उघड झाली आहे. भाजपला तब्बल 8 हजार 358 देणगीदारांनी भरभरून देणग्या दिल्याचे अहवालात म्हटले आहे.

भाजपला 2244 कोटींची देणगी, ED ची धाड पडलेल्या कंपन्यांकडूनही निधी; निवडणूक आयोगाने उघड केली आकडेवारी

राजकीय पक्षांनी 20 हजार रुपयांहून अधिक देणग्यांबाबतची माहिती निवडणूक आयोगाला सादर केली. त्यावर आधारित अहवाल एडीआरने तयार केला आहे. राष्ट्रीय पक्षांना तब्बल 12 हजार 547 देणगीदारांकडून 2 हजार 544.28 कोटी रुपयांच्या एकूण देणग्या मिळाल्या. त्यानुसार 2023-24 च्या तुलनेत त्याआधीच्या वर्षीपेक्षा देणग्यांमध्ये 199 टक्क्यांची वाढ झाल्याचे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे.

88 टक्के देणग्या एकट्या भाजपला
सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी एकटय़ा भाजपला तब्बल 88 टक्के देणग्या मिळाल्याचे एडीआरच्या अहवालातून समोर आले आहे. काँग्रेसला 1 हजार 994 देणगीदारांकडून 281.48 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. 2022-23 या आर्थिक वर्षात भाजपला 719.858 कोटींच्या देणग्या मिळाल्या होत्या.