
लोकसभा निवडणुकीत भाजपवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडला असल्याचे समोर आले आहे. भाजपला एका वर्षांत तब्बल 4 हजार 140.47 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने हा अहवाल जारी केला आहे. काँग्रेसला 1 हजार 225.12 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. इलेक्टोरल बॉण्डमधून पक्षांना सर्वाधिक देणग्या मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे.
भाजपने एकूण देणग्यांपैकी 2 हजार 2211.69 म्हणजेच 51 टक्के देणग्या लोकसभा निवडणुकीत खर्च केल्या, तर काँग्रेसने एकूण देणग्यांपैकी 1025.25 कोटी म्हणजेच 83.69 टक्के देणग्या खर्च केल्या. सर्व पक्षांना जितकी देणगी मिळाली त्यापैकी 74.57 टक्के देणगी एकट्या भाजपला मिळाल्याचे ‘एडीआर’च्या अहवालातून समोर आले आहे.
इलेक्टोरल बॉण्डमधून सर्वाधिक देणग्या
‘एडीआर’च्या अहवालात इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना सर्वाधिक देणग्या मिळाल्याचे म्हटले आहे. भाजपला 1,685.63 कोटी रुपये मिळाले. काँग्रेसला 828.36 कोटी रुपये आणि आपला 10.15 कोटी मिळाले. या तिन्ही राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डद्वारे एकूण 2,524.1361 कोटी रुपये मिळाले. ही रक्कम त्यांच्या एकूण कमाईच्या 43.36 टक्के आहे. दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये इलेक्टोरल बॉण्ड घटनाबाह्य असून हा संपूर्ण मनमानी कारभार असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने योजनाच रद्द केली होती.