आमदार विजय देशमुख हे अफझलखानाची अवलाद! भाजपचे हेमंत पिंगळे यांचा हल्लाबोल

सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार देशमुख हे उमेदवारीसाठी ‘मी नाही, तर माझा मुलगा,’ अशी भूमिका घेत आहेत. ‘देशमुख म्हणजे अफझलखानाची अवलाद,’ असा आरोप भाजप कार्यकारिणीचे सदस्य हेमंत पिंगळे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आमदार विजय देशमुख व त्यांचा मुलगा किरण देशमुख यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर उत्तर मतदारसंघामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये देशमुखांच्या उमेदवारीवरून प्रचंड खदखद सुरू आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य हेमंत पिंगळे यांनी आमदार विजय देशमुख यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला आहे.

हेमंत पिंगळे म्हणाले, ‘आमदार विजय देशमुख यांनी गेली चार टर्म सत्ता उपभोगली आहे. आता मुलगा किरण देशमुख याला पुढे करीत आहेत. किरण देशमुख याचे शहर मध्यच्या मतदारयादीत नाव असताना त्याला शेळगीत उमेदवारी दिली. कारण शहर मध्यच्या प्रभागात त्यांचा पराभव अटळ होता. देशमुख हे पालकमंत्री होते. शहरासाठी आणि जिह्यासाठी त्यांनी काय केले? बसवेश्वर महाराज स्मारकाचे काम अपूर्ण आहे. निधी नाही. सत्तेचा उपयोग स्वतःसाठी व मुलाला पुढे आणण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांत खदखद सुरू झाली आहे. देशमुख म्हणजे अफझलखानाची अवलाद असून, त्यांना उमेदवारी मिळाल्यास पराभव अटळ आहे, हे भाजपलाही माहीत झाले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये,’ अशी मागणी त्यांनी केली.

हेमंत पिंगळे म्हणाले, ‘देशमुखांना वगळून दुसऱ्या कोणालाही उमेदवारी द्यावी. याबाबत वरिष्ठांना सांगितले असून, देशमुखांचा डेटा पक्षाकडे आहे. देशमुख म्हणजे शहर उत्तर मतदारसंघाला लागलेला कॅन्सर आहे. तो काढल्यावरच भाजपची स्थिती सुधारेल,’ असा हल्लाबोल त्यांनी केला.