मुंबईची आर्थिक हत्या करणाऱ्या भाजपला रोखावेच लागेल, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

भारतीय जनता पक्ष मुंबईची आर्थिक हत्या करून आसुरी आनंद घेतोय, त्याला कुठेतरी रोखावेच लागेल, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुंबईची आर्थिक हत्या होत असतानाही महानगरपालिकेचे प्रशासक त्याकडे लक्ष देत नाहीत यासारखे दुर्दैव नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मुंबईतील पाणीप्रश्नी शिवसेना भवनात आज शिवसेना नेते, उपनेते आणि पदाधिकाऱयांची आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, टँकर्स असोसिएशनच्या मागण्या गेल्या दोन-तीन वर्षांपासून आहेत. पेंद्राने त्यांना लावलेली नियमावली काही शहरांमध्ये लागू होऊ शकते तर काही शहरांमध्ये लागू होत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने ती लागू न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु भाजप आणि सध्याचे सरकार बेस्टचे हाल करणे, कचरा कर लावणे आणि पाण्याची समस्या निर्माण करणे या माध्यमांतून मुंबईची आर्थिक हत्या करतेय, असे आदित्य ठाकरे म्हणाले. टँकरचालकांच्या संपामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सण उत्सवाच्या काळात अनेकांच्या घरी पाणी नाही. सोसायटय़ांना वाटते की, एसआरए प्रकल्पांनी पाणी घेतलेय, एसआरएमधील नागरिकांना वाटतेय की चाळींनी पाणी घेतले आणि चाळकऱयांना वाटतेय की सोसायटय़ांनी पाणी पळवलेय, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

‘मराठीची पाठशाळा’ सर्वांना मराठी बोलायला शिकवेल

मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त परराज्यातून येणाऱ्या लोकांना मातृभाषा मराठीचे धडे देण्यासाठी शिवसेनेने ‘मराठी पाठशाळा’ हा उपक्रम सुरू केला असून ही पाठशाळा सर्वांना मराठी बोलायला शिकवेल, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. कांदिवली येथील ‘मराठी पाठशाळे’ला आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. ज्यांना मराठी भाषा शिकायची आहे त्या प्रत्येकाचे शिवसेनेच्या या उपक्रमात मनापासून स्वागत करतो असे ते म्हणाले. केवळ कांदिवलीमध्येच नाही तर संपूर्ण मुंबईत हा उपक्रम सुरू झाला असून मराठीचा अपमान करणाऱ्यांना त्याद्वारे चांगली प्रतिक्रिया मिळत आहे, असे ते पुढे म्हणाले. मनसे ही भाजपची बी टीम आहे, भाजप आणि मनसेची सेटिंग आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.