भाजप प्रचाराचा नारळ उभा फुटला…पण गर्दीअभावी सभा आडवी झाली

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील माचणुर येथील श्री महादेवाचे दर्शन करुन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. प्रचाराचा नारळ उभा फुटल्याचे समाधान व्यक्त होत असतानाच शुभारंभाची सभा मात्र गर्दी अभावी आडवी झाली. सभेला दोन आजी माजी आमदारांची उपस्थिती असूनही मतदारांनी या शुभारंभाच्या सभेकडे पाठ फिरविली. जनतेच्या अनास्थेमुळे या मतदारसंघात महायुतीचे टेन्शन वाढले आहे.

गावच्या वेशीवर ठेकेदार कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण करत नेत्यांचे स्वागत केले. फुलांच्या पाकळ्या डोक्यावर उधळून घेत नेतेमंडळी हलगीच्या कडकडाटात मंदिरात पोहचले. दर्शन करुन त्यांनी नारळ फोडला आणि मंदिरासमोर शुभारंभाची पहिली सभा झाली. या सभेला जेमतेम गर्दी होती. लाडकी बहिण योजनेचा गवगवा करणाऱ्या नेत्यांच्या या सभेला महिलांचा थंड प्रतिसाद होता. बोटावर मोजता येईल एवढीच महिलांची संख्या होती. शुभारंभाच्या सभेलाच गर्दी नसल्याने भाजपचे चांगलेच हसे झाले.

परिचारक आणि आवताडे या दोन भाजप नेत्यांमध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून बिनसले आहे. असे असूनही ते दोघे एका व्यासपीठावर प्रथमच एकत्र येत होते. एकाच व्यासपीठावर ते दोघे जवळ बसले असले तरी मनाने ते खूप दूर गेल्याचे परिचारक यांच्या देहबोलीवरुन जाणवत होते. आपल्या मनातील भाव आले डोळे बोलून जातात याची जाणीव असल्याने परिचारक यांनी जाणीवपूर्वक डोळ्यावर काळा गॉगल लावला होता. गॉगलमागे आवताडे यांच्याविषयी असलेली नाराजी झाकण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले होते.

एबी फार्म घेऊन लाईन लागली होती पण…
भाजप नेते प्रशांत परिचारक विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता आवताडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे परिचारक प्रचंड नाराज आहेत. पक्षश्रेष्ठींनी तंबी दिल्याने परिचारक नाईलाजाने प्रचार उतरले आहेत. यावेळी झालेल्या सभेत बोलताना परिचारक म्हणाले की, मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे पक्षाने मला थांबायला सांगितले. मी पक्ष बदलायचे ठरविले असते कोणीही उमेदवारी द्यायला तयार होते. माझ्या दारात एबी फॉर्म घेऊन अनेक पक्षाची लाईन लागली होती, असे हास्यास्पद विधान त्यांनी केले. या सभेत ना जोश होता जल्लोष… मात्र, सभेकडे जनतेने फिरवलेली पाठ आणि परिचारक यांचे हास्यास्पद विधान यामुळे भाजपचे चांगलेच हसे झाल्याचे दिसून आले.