लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून आगामी निवडणुकाही जिंकू शकतो असे संकेत महाविकास आघाडीने दिल्यानंतर महायुतीमध्ये चुळबुळ सुरू झाली. आता विधानसभेत आपले काही खरे नाही हे भाजपा, मिंधे गट आणि अजित पवार गटाला कळून चुकले आहे. फुटाफुटी आणि क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने महायुती टेन्शनमध्ये आहे. म्हणूनच विधान परिषदेच्या निवडणुकीत ते ताकसुद्धा फुंकून पित आहेत. 11 जागा आणि उमेदवार 12, त्यामुळे स्वगृही परतण्याचे वेध लागलेल्या आमदारांची मते विधान परिषदेत कोणत्या 11 उमेदवारांना मिळणार आणि कोणाचे बारा वाजणार हे 12 जुलैलाच स्पष्ट होईल.
लोकसभेतील विजयानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीतील पक्षांनी बाजी मारली. शिवसेनेने मुंबईतील दोनही जागा जिंकल्या. लोकसभेतील पराभव आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्येही पीछेहाट झाल्याने भारतीय जनता पक्षात नाराजी आहे. अजित पवार गटातील आमदार तर स्वगृही परतण्यास इच्छुक आहेत. त्यांना पक्षात पुन्हा स्थान मिळेल असे संकेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते. विधान परिषद निवडणुकीत हे आमदार क्रॉस वोटिंग करून स्वगृही परतण्याचा आपला मार्ग आणखी प्रशस्त करतील की काय अशी भीती प्रामुख्याने अजित पवार गटाला वाटत आहे.
आमदार फुटू नयेत म्हणून भाजपने त्यांना एकाच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी तर आपल्या आमदारांवर नजर ठेवायला गुप्तहेर नेमले असल्याची विधिमंडळात चर्चा आहे. मिंधे गटाच्या आमदारांमध्ये त्या तुलनेत थोडी कमी चुळबुळ आहे आणि मिंधे गटाचे आमदार स्वतःच एकमेकांवर लक्ष ठेवून आहेत. विधान परिषदेच्या माध्यमातून मिंधे गटाला त्यांचे खासदारकीला पडलेले भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचे पुनर्वसन करायचे आहे.
12 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधान परिषदेत जाणारे सर्व 11 सदस्य हे विधानसभेच्या आमदारांद्वारे निवडले जातात. विधानसभेत सध्या महायुतीकडे भाजपा-103, मिंधे गट-37, अजित पवार गट-39, इतर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या जोरावर महायुतीने 9 उमेवार रिंगणात उतरवले आहेत. महाविकास आघाडीकडे शिवसेना-15, काँग्रेस-37, राष्ट्रवादी काँग्रेस-13 तसेच शेकाप आणि अपक्ष असे 67 आमदार आहेत. महायुतीचे 8 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार पहिल्या फेरीत सहज निवडून येऊ शकतात. मात्र महाविकास आघाडीने अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्याने महायुती चक्रावली आहे.
– महाविकास आघाडीकडून मिलिंद नार्वेकर (शिवसेना), प्रज्ञा सातव (काँग्रेस), जयंत पाटील (शेकाप) तर महायुतीकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत (भाजप), भावना गवळी आणि कृपाल तुमाने (मिंधे गट), राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे (अजित पवार गट) हे उमेदवार रिंगणात आहेत.
सदाभाऊ की गर्जे
11 जागांसाठी 12 उमेदवार असल्याने एकाचा विकेट पडणे अपरिहार्य आहे. मग तो पडणार कुणाचा. भाजपामधील एकाचा पाडायचा झाला तर तो सदाभाऊ खोत असू शकतात. कारण अन्य चार उमेदवार हे भाजपाचे आपले आहेत तर सदाभाऊ हे बाहेरून भाजपात आलेले आहेत. अजित पवार गटाच्या दोन उमेदवारांमध्ये शिवाजीराव गर्जे यांचे काही खरे नाही, अशी चर्चा त्यांच्याच आमदारांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
भीतीने सत्ताधाऱयांना आमदार सांभाळावे लागत आहेत
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार असून आम्ही या तिन्ही जागा जिंकू याची आम्हाला खात्री आहे. क्रॉसव्होटिंगची सर्वाधिक भीती सत्ताधाऱयांना असल्याने त्यांना आपले आमदार सांभाळावे लागत आहेत, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले.