भाजपकडून मिंध्यांना आणखी एक धक्का; पंढरपुरातील दर्शन मंडप, स्कायवॉकच्या 129 कोटींच्या कामाची प्रक्रिया थांबविली

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील सध्याची दर्शन रांग व्यवस्था अपुरी असल्यामुळे दर्शन मंडप व स्कायवॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी, यासाठी 129 कोटी 49 लाख रुपयांतून दर्शन मंडप आणि स्कायवॉकचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाची प्रक्रिया थांबवून भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का दिला आहे. यासाठी तांत्रिक मुद्दा समोर आणण्यात आला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीकडून पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्कायवॉकसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली होती. त्याआधी जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून 23 सप्टेंबरला मंजुरी देण्यात आली होती.