ठाणे विधानसभेची निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा निवडणूक आयोगापासून लपवून ठेवला आहे. मात्र त्यांच्यावरील गुह्याची एफआयआर प्रतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना देत केळकर यांची उमेदवारी रद्द करण्याची याचिका दाखल केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारणे देत ही याचिका फेटाळली. संबंधित अधिकारी आमच्या याचिकेची दखल न घेता एकतर्फी निर्णय देणार असतील तर आम्हाला लोकशाहीत न्याय मिळणार की नाही, असा संतप्त सवाल विचारे यांनी केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निकालाविरोधात विचारे उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत.
ठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे, भाजपचे संजय केळकर व मनसेचे अविनाश जाधव यांच्यात तिरंगी लढत होत आहे. निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या दालनात आज अर्जांची छाननी करण्याचे काम सुरू होते. त्या वेळी संजय केळकर यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात एका गुह्याची माहिती दिली नसल्याने त्यावर विचारे यांचे निवडणूक प्रतिनिधी व शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, सचिव सुरेश मोहिते यांनी आक्षेप घेतला.
वकिलांनी जोरदार बाजू मांडली
संजय केळकर यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. त्यावर उर्मिला पाटील यांनी सुनावणी घेत या मागणीचा अर्ज फेटाळून लावला. अॅड. मुनीर अहमद व सुषमा मिश्रा यांनी विचारे यांची जोरदार बाजू मांडली. तरीही निवडणूक अधिकाऱ्यांची ही बाजू ग्राह्य न धरता एकतर्फी निकाल देत अर्ज फेटाळला. त्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार असल्याची माहिती मधुकर देशमुख यांनी दिली.
नेमका गुन्हा कोणता?
कोविडचे निर्बंध असतानाही ठाण्यात भाजपचे संजय केळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी 26 जून 2021 रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. विशेष म्हणजे कोणी मास्कदेखील लावला नव्हता. जमावबंदी असूनही भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे केळकर यांच्यासह अन्य काही जणांवर कलम 118, 269, 34, 144 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुह्याची माहिती केळकर यांनी प्रतिज्ञापत्रात दिली नाही. त्यावर राजन विचारे यांनी आक्षेप घेतला होता.
न्याय मिळणार की नाही?
ठाण्यातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना एक गुन्हा लपवला असल्याचे सर्व पुरावे आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले आहेत. एवढेच नव्हे तर त्या गुह्याची एफआयआर कॉपीदेखील सादर केली. तरीदेखील संबंधित अधिकारी कानाडोळा करीत एकतर्फी निर्णय देणार असतील तर आम्ही जायचे कुठे, असा संतप्त सवाल शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी केला आहे.