भाजप उमेदवार बंब यांची मतदारांना दमदाटी

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत चांगलाच राडा झाला. 15 वर्षे आमदार म्हणून तुम्ही कोणती कामे केली ती आधी सांगा, असा प्रश्न तरुणांनी विचारताच प्रशांत बंब आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. यावरून चांगलाच गोंधळ उडाला असून प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारणाऱया तरुणांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे गेल्या 15 वर्षांपासून आमदार आहेत. गंगापूर खुलताबाद मतदार संघामध्ये कॉर्नर सभा सुरू असताना काही तरुणांनी त्यांना प्रश्न विचारला. तुम्ही 15 वर्षे या मतदारसंघाचे आमदार होतात. तुम्ही काय काम केले? रेल्वे आणू असे तुम्ही म्हटले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी बंब यांना भरसभेत विचारला. अनपेक्षित प्रश्नामुळे प्रशांत बंब यांनी त्यावर उत्तर दिले. ते म्हणाले की, मी आमदार नसलो तर तू मरेपर्यंत पस्तावशील. मी आमदार नसलो तर हे लोक हालत खराब करतील तुमची. इथे लोक शांत बसलेले आहेत, असे म्हटले.