आसाममधील बिहार दिवस रद्द करण्याची भाजपवर नामुष्की; काँग्रेसची टीका

भाजपने आसाममध्ये ‘बिहार दिवस’ साजरा करण्याची योजना आखली होता. मात्र, आता हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे. काही प्रादेशिक राजकीय पक्ष, समुदाय-आधारित संघटना आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसम (इंडिपेंडंट) यांच्या निषेधानंतर भाजपने 22 मार्च रोजी पूर्व आसामच्या तिनसुकियामध्ये ‘बिहार दिवस’ साजरा करण्याची योजना रद्द केली आहे. भाजपवर हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढवल्यावर काँग्रेसने यावर टीका केली आहे.

याबाबत प्रदेश भाजप अध्यक्ष आणि खासदार दिलीप सैकिया म्हणाले की स्थानिक भावना दुखावू नयेत म्हणून पक्षाने बिहार-विशिष्ट दिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, नागालँड आणि इतर राज्यांनी ‘आसाम दिवस’ साजरा केला आहे याकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की ‘बिहार दिवस’ साजरा करण्यास विरोध केल्याने जातीय द्वेष दिसून येतो.

याबाबत काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मिळालेल्या वृत्तानुसार, 22 मार्च रोजी आसाममधील तिनसुकियामध्ये ‘बिहार दिन’ साजरा केला जाणार होता, आता सरकारने तो कार्यक्रम रद्द केला आहे. या कार्यक्रमाला उल्फा (आय) सारख्या गटांनी विरोध केला. निदर्शने झाली आणि कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली. अशा वेळी भाजप आणि हिंदीबाबत विनाकारण बढाई मारणारे हिमंता बिस्वा शर्मा कुठे आहे? जर तामिळनाडूमध्ये असा कार्यक्रम रद्द झाला असता, तर त्यांनी या मुद्द्याचे राजाकारण केले असते, तेथे अशी शांतता असती का? असा सवालही त्यांनी केला आहे.