कल्याण बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा खोडा;मतदार यादी विलंबाच्या नोटिसीला उत्तर देण्याची प्रशासकांना आजची डेडलाईन

कल्याण बाजार समितीच्या निवडणुकीला भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका बसला आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाण, – आमदार सुलभा गायकवाड आणि आमदार किसन कथोरे यांच्या व्यक्तिगत सोयीच्या राजकारणामुळे निवडणुकीचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक घेण्याचे – आदेश देऊनही प्रशासक असलेले जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे – निवडणूक पुढे ढकलत आहेत. मात्र निवडणुकीच्या कामकाजात हयगय करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबत झालेल्या विलंबाचा खुलासा 28 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश मांडे यांना निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. ही मुदत सोमवारी संपत असल्याने ते काय खुलासा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रारूप मतदार यादी तयार करून कल्याण बाजार समितीची निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार बाजार समितीने प्रारूप मतदार यादी तयार करून बाजार समिती कल्याण पवार मुख्य बाजार आवार जिल्हा उपनिबंधक यांना सादरही केली. मात्र अंतिम मतदार यादी निबंधकांनी जाहीर केली नाही. याची गंभीर दखल राज्य निवडणूक प्राधिकरणाने घेतली आणि दोन दिवसांपूर्वी किशोर मांडे यांना खरमरीत पत्र पाठवले. यामध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबत झालेल्या विलंबाचा खुलासा 28 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले. असे असतानाही अंतिम मतदार यादी तयार करण्याऐवजी शनिवारी सुट्टीच्या दिवशीही मांडे बाजार समितीत ठाण मांडून होते.

थेट मंत्रालयातून हस्तक्षेप
कल्याण एपीएमसीची निवडणूक जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे जाणीवपूर्वक लांबणीवर टाकत असल्याची कैफियत घेऊन काही माजी संचालक पणन मंत्री जयकुमार रावल यांना भेटायला गेले होते. – त्यावेळी रावल यांनी रवींद्र चव्हाण यांना भेटण्याचा सूचक सल्ला संचालकांना दिल्याची चर्चा आहे. आमदार किसन कथोरे यांनाही पणन मंत्र्यांनी हाच सल्ला दिल्याचे समजते. दरम्यान लोकनियुक्त बॉडीचा अडसर नको म्हणून पणन संचालक विकास रसाळ आणि मंत्र्यांचे पीएस प्रशांत पाटील ‘अर्थपूर्ण’ – कारणाने प्रशासक किशोर मांडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप काही माजी संचालकांचा आहे.