मिंधे-दादांना गॅसवर ठेवून भाजपची यादी, पहिल्या यादीत फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह 99 उमेदवार

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे आज समोर आले. जागा वाटप झाले नसतानाही भारतीय जनता पक्षाने मिंधे गट आणि अजित पवार गटाला गॅसवर ठेवून आज आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. मिंधे सरकारबद्दल राज्यातील जनतेमध्ये असलेला रोष लक्षात घेऊन भाजपने बहुतांश ठिकाणी मंत्री आणि आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मागच्या वेळी तिकीट कापले गेलेले विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पहिल्या यादीत समावेश आहे.

भाजपच्या महाराष्ट्रातील 99 उमेदवारांची यादी आज दिल्लीतून जाहीर झाली. देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम तर चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, लोकसभेला पराभूत झालेले सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित आणि अतुल सावे या विद्यमान मंत्र्यांनाही उमेदवारी मिळाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपने कुलाबा येथून पुन्हा रिंगणात उतरवले आहे.

z कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने या मतदार संघातून तिकीट दिले आहे.

हरियाणा पॅटर्नला भाजप घाबरली

येत्या निवडणुकीत भाजपकडून महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न राबवला जाईल अशी शक्यता व्यक्त होत होती. हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही 30 टक्के विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जातील अशी चर्चा होती. परंतु तसे न करता भाजपने जुन्याच आमदारांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे.

घराणेशाही जोरात… अशोक चव्हाणांच्या कन्येला भोकरमधून तिकीट

कॉंग्रेस सोडून भाजपाच्या वळचणीला गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांना भाजपने भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना कणकवलीतून पुन्हा तिकीट मिळाले आहे, तर मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना वांद्रे पश्चिममधून आणि त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून भाजपने उमेदवारी दिली.