भाजपनं पराभव स्वीकारला; प्रचाराच्या तोफा थंडावण्याआधीच मोदींनी रणभूमीतून पळ काढला! रेवंत रेड्डी यांचा हल्लाबोल

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या बुधवारी मतदान होणार आहे. त्यासाठी गेले 12-13 दिवस राज्यभरात प्रचारसभांच्या धडाक्याने वातावरण चांगलेच तापले. आज शेवटच्या दिवशीही प्रचाराच्या तोफा धडधडणार आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशात पळ काढला, असा हल्लाबोल तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. प्रचारतोफा थंडावण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी देश सोडून विदेशात पळाले आहेत. याचाच अर्थ भारतीय जनता पक्ष आणि मोदींनी पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रणभूमीतून पळ काढला, असा टोला रेवंत रेड्डी यांनी लगावला.

भाजपने आज वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींचाही रेड्डी यांनी उल्लेख केला. ते म्हणाले. भाजपने आज वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिराती मी पाहिल्या. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप देशात फूट पाडत आहे. कोणतीही समस्या, आपत्ती आली तेव्हा संपूर्ण देशाने त्याचा एकजुटीने सामना केला. मग बॉम्बस्फोट असो किंवा हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्चन दंगली असो… कोणतीही आपत्ती आली तर देश एकजुटीने उभा राहोत आणि त्याचा सामना करताना दिसतो.

पण मोदी तीन वेळा पंतप्रधान झाले. 11 वर्षापासून ते पंतप्रधान आहेत. पण भाजप आणि मोदींनी काय केले, गरीबांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने काय केले याबाबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नसल्याने ते बॉम्बस्फोट आणि इतर मुद्दे प्रचारात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.