नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावरून भाजप व मित्रपक्षांमध्ये वादाला सुरवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी मोहटा देवी गडावर जाऊन शिवस्वराज्य यात्रेला सुरवात करत आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक आपण किंवा आपले पती आमदार निलेश लंके हे लढवणार असल्याचे जाहीर केले. लंके यांच्या या भूमिकेमुळे भाजप व मित्रपक्षात धुसफूस सुरु झाली असल्याचे मानले जात आहे.
राणी लंके या मोहटा देवीगडावर गेल्या. मोहटा देवीचे दर्शन घेत त्यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. यानंतर पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीचाच एक भाग म्हणून नगर दक्षिण मध्ये आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु करण्यात आली असल्याची माहिती दिली. या वेळी लंके म्हणाल्या की छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याने शिवरायांचे चरित्र नगर दक्षिण जिल्ह्यातील प्रत्येक घराघरांत व मनामनात पोहचवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. पंधरा दिवसानंतर आमदार लंके यांच्या उपस्थितीत नगर येथे यात्रेचा समारोप केला जाणार आहे.
आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असून समोर कोण उमेदवार आहे याचा विचार न करता आपण निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीत मला किंवा आमदार लंके यांनी उमेदवारी निश्चित मिळू शकते. शिवस्वराज्य यात्रेत लंके प्रतिष्ठानच्या दहा गाड्या सहभागी होणार असून त्या मध्ये पाच शिवव्याख्याते असणार आहेत. नगर दक्षिण मधील प्रत्येक तालुक्यात जाऊन चौकाचौकात शिवरायांचे महत्व जनतेला पटवून देणार आहोत.