डिजिटल चलन ‘बिटकॉईन’ने नवा विक्रम केला. या चलनाने पहिल्यांदाच 95 हजार डॉलरचा आकडा गाठला. आशियाई व्यापारात 95,004.50 डॉलरपर्यंत चलन पोहोचले आहे. बिटकॉईन लवकरच 1 लाख डॉलरचा जादुई आकडा गाठेल, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे.
बिटकॉईनमधील वाढीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प क्रिप्टोकरन्सी उद्योगासाठी अनुकूल धोरण आणतील, असा गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान युनायटेड स्टेट्सला ‘जगातील बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी कॅपिटल’ बनवण्याचे वचन दिले होते. त्याकडे गुंतवणूकदार आणि व्यावसायिक मोठी संधी म्हणून पाहत आहेत. अमेरिकेतील निवडणुकीपासून बिटकॉईनमध्ये सुमारे 40 टक्के वाढ झाली.
क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी
जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजाराने 3 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. तसेच गेल्या 24 तासांत त्यात 0.42 टक्के घट झाली आहे, तसेच 5 नोव्हेंबरपासून जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅपमध्ये 800 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 5 नोव्हेंबर रोजी जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 2.26 ट्रिलियन डॉलर होते, जे 3.07 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढलेले आहे.