आर्थर रोड तुरुंगातील बिष्णोई टोळीच्या गॅंगस्टर्सना दुसरीकडे हलवणार; पोलिसांचा कोर्टात अर्ज

Lawrence-Bishnoi

दक्षिण मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात गॅंगवॉर भडकण्याच्या भितीने पोलिसांनी खबरदारीचे पाऊल टाकले आहे. आर्थर रोड तुरुंगात अनेक कुख्यात गुंड कैद आहेत. विविध टोळ्यांमध्ये डी कंपनी तसेच गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई सदस्यांचा समावेश आहे. बिष्णोई टोळी पुन्हा सक्रीय झाली असून बिष्णोई आणि दाऊद इब्राहिमच्या सदस्यांमध्ये गॅंगवॉर भडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याच भितीपोटी पोलिसांनी बिष्णोई टोळीच्या गॅंगस्टर्सना दुसऱ्या तुरुंगात हलवण्यासाठी सत्र न्यायालयात तसा अर्ज केला आहे.

बाबा सिद्धीकी हत्याकांड प्रकरण तसेच अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात नाव पुढे आलेल्या बिष्णोई टोळीच्या सदस्यांना आर्थर रोड तुरुंगातून राज्यातील अन्य तुरुंगात हलवण्याची मागणी पोलिसांनी केली आहे. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या घडीला आर्थर रोड मध्यवर्ती तुरुंगात बिष्णोई टोळीच्या गुंडांची संख्या 20 पेक्षा अधिक आहे.

बिष्णोई टोळीचे गुंड तुरुंगातच आपला एक वेगळा गट बनवू शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता तुरुंग प्रशासनाने विचारात घेतली आहे. त्याच अनुषंगाने पोलीस खबरदारीची विविध पावले उचलत आहेत. आर्थर रोड तुरुंगात डी कंपनी आणि छोटा राजन टोळीच्या गुंडांची संख्याही अधिक आहे.

आर्थर रोड मध्यवर्ती तुरुंगात आधीच कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यातच कुख्यात गुंडांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच असल्यामुळे तुरुंग प्रशासन आणि पोलिसांची चिंता वाढली आहे. बाबा सिद्धीकी हत्याकांड आणि सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना उच्च सुरक्षित असलेल्या विशेष सेलमध्ये बंदिस्त केले आहे, जेणेकरून त्यांचा इतर कैद्यांशी संपर्क होणार नाही. क्राईम ब्रांचने बाबा सिद्धीकी हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत 18 आरोपींना अटक केली आहे.