उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव! ‘मातोश्री’वर अवघा महाराष्ट्र लोटला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरातून ‘मातोश्री’वर आलेल्या हजारो निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचे अभीष्टचिंतन केले. पुन्हा मुख्यमंत्री व्हा, अशा शुभेच्छाही दिल्या. उद्धव ठाकरे यांनीदेखील अत्यंत आत्मीयतेने शुभेच्छांचा स्वीकार करीत सर्वांचे मनापासून आभार मानले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मुंबईसह राज्यभरात धूमधडाक्यात साजरा झाला. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर अवघा महाराष्ट्र लोटला होता. कलानगरात पंढरीच्या वारीसारखी गर्दी झाली होती. सर्वसमावेशक हिंदुत्वाची आस तुम्ही, अखंड ‘महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख’ तुम्ही! अशा शब्दांत हजारो आबालवृद्ध शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींनी महाराष्ट्राच्या या कणखर, संयमी, लढवय्या नेतृत्वावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच कलानगर परिसरात शिवसैनिकांची गर्दी झाली होती. कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच मातोश्रीबाहेर भव्य आणि आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. शिवसेनेचे नेते, उपनेते, पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मातोश्रीवर आले   होते. भारतीय कामगार सेना, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि शिवसेनेच्या संलग्न संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठय़ा संख्येने ‘मातोश्री’वर आले होते. महाविकास आघाडीचे नेते आणि लोकप्रतिनिधींनीही ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले.

कोरोना काळानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा केल्याने यंदा ‘मातोश्री’वर शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच शिवसैनिकांचे विभागनिहाय जथे ‘मातोश्री’वर दाखल होत होते. शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिकांनी मोठय़ा प्रेमाने उद्धव ठाकरे यांना केक, शाल, पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा देऊन त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हा अशा शुभेच्छा दिल्या. सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोटो, सेल्फीही काढले. राजकीय, सामाजिक, कला, साहित्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांतील मंडळीही वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर आली होती. दिव्यांग बांधवही आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी मोठय़ा आदरपूर्वक सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून आभार व्यक्त केले. यावेळी मातोश्रीचा परिसर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या जयघोषाने दुमदुमला.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेनेच्या आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना उदंड, निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

भावी मुख्यमंत्री… होर्डिंग्ज झळकले

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे भव्य होर्डिंग्ज चर्चेचा विषय बनले होते. कलानगर परिसरासह मुंबई महाराष्ट्रातील चौकाचौकांमध्ये होर्डिंग्ज लावण्यात आले होते. अनेक होर्डिंग्जवर शिवसैनिक आणि चाहत्यांनी उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “बेशक संघर्ष के हमारे दिन लम्बे हैं, पर हमारे हौसले भी बुलंद हैं…’’ अशा स्वरूपाचा आशय त्या बॅनरवर आहे. तामीळनाडू शिवसेनेच्या वतीने कलानगरबाहेरील मार्गावर लावलेल्या होर्डिंग्जवर उद्धव ठाकरे यांचा तामीळ पेहरावातील फोटो लक्षवेधी ठरला होता. उद्धव ठाकरे यांनाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवायचा निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय, अशा आशयाचे बॅनर कलानगरच्या परिसरात झळकले आहेत.

मुंबईबाहेरही कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये होर्डिंग्ज लावून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सांगलीतील शिवसेनेचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख आपल्या बॅनरवर केला आहे. सांगली शहरासह जिह्यात ठिकठिकाणी हे बॅनर लोकांचे आकर्षण ठरले आहेत. कोकणातही बॅनर्स आणि होर्डिंग्जबरोबर सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला गेला.

तुम जियो हजारो साल

शिवसैनिकांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तुम जियो हजारो साल…हे गाणे गाऊन शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

कोरोना काळानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा केल्याने यंदा मातोश्रीवर शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.

उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मुस्लिम आणि शीख बांधवही आले होते. शीख बांधवांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना तलवार भेट देऊन त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारलेल्या कमानीमध्ये धनुष्यबाणासारखी फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.