टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी अनेक आशियाई देशातील घटते प्रजनन दर आणि वृद्ध लोकसंख्येतील वाढ याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एलन मस्क यांनी ट्वीट करत घटत्या प्रजनन दरावर भाष्य केले आहे. “सिंगापूर आणि इतर अनेक देश नामशेष होत चालले आहेत. सिंगापूरमधील वाढती वृद्ध जनसंख्या, घटते मनुष्यबळ यामुळे सिंगापूरमध्ये कारखान्यांपासून फूड डिस्ट्रीब्युशनसाठी रोबोटचा वापर केला जात आहे. 2023 पर्यंत, 25 टक्के सिंगापूरचे लोक 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील.”, एलन मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये आहे.
लोकसंख्येचे संतुलन राखण्यासाठी प्रजनन दर 2.1 टक्के आवश्यक आहे. मात्र सिंगापूरमध्ये प्रजनन दर 0.97 टक्क्यांवर गेला आहे. दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग आणि चीन सारख्या देशांमध्ये हा ट्रेंड दिसून येत आहे. हिंदुस्थानही याच मार्गावर आहे. सिंगापूरच्या “बेबी क्रायसिस” वरील लेखाला प्रतिसाद देत मस्क यांनी प्रजनन दरावर टिपण्णी केली आहे.
दक्षिण कोरियामध्ये परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे. 1970 च्या दशकापर्यंत दक्षिण कोरिया, जपान आणि चीनसारख्या देशांत महिलांना सरासरी पाच पेक्षा जास्त मुले होती. मात्र आता या देशांमध्ये स्त्रिया मूलच जन्माला घालत नाहीत. दक्षिण कोरियाचा प्रजनन दर 0.72 टक्क्यांवर घसरला आहे. आर्थिक दबाव आणि घरांच्या वाढत्या किंमती यामुळे येथील 20 ते 30 वर्षे वयोगटातील महिला डेटिंग, विवाह आणि मुले जन्माला घालत नाहीत. असाच ट्रेंड राहिला तर दक्षिण कोरियाची लोकसंख्या 2100 पर्यंत निम्म्यावर येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
लॅन्सेटच्या अहवालानुसार, देशातील विवाह दर 5.5% पर्यंत घसरला असून 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. दक्षिण कोरियाच्या 51.6 दशलक्ष लोकसंख्येपैकी सुमारे 19.5% लोक 65 वर्षांपेक्षा जास्त आहेत.
गेल्या 70 वर्षांत संपूर्ण जगभरात प्रजनन दरात 50% घट झाली आहे. 1947 नंतरचा सर्वात कमी प्रजनन दर नोंदवून जपान जगातील वृद्धांचा देश ठरला आहे. तर सिंगापूरमध्ये प्रजनन दर 0.97 वर घसरला आहे. सिंगापूरमधील 25 ते 34 वयोगटातील महिला अविवाहित राहणे पसंत करीत आहेत. यामुळे सिंगापूरमधील ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या सहा वर्षांत 24 टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. यामुळे सिंगापूर जपानप्रमाणेच “सुपर-एज्ड सोसायटी” बनण्याच्या मार्गावर आहे.