नागपुरातील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबटय़ाचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात वाघोबा, बिबटे, कोह्यांना देण्यात येणारे ‘चिकन’चे खाद्य बंद करण्यात आले आहे. शिवाय मांसाहारी प्राण्यांच्या निवासाच्या ठिकाणी डय़ुटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कडक नियमावली तयार करण्यात आली असून ‘ऑन डय़ुटी’ कोणतीही मूव्हमेंट करण्यास निर्बंध घालण्यात आल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून अनेक देशात ‘एच 5, एन 1’ अर्थात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. याचा प्रसार हिंदुस्थानमध्येही झाला असून जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात नागपूर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्राणिसंग्रहालयांना रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या उद्यान व प्राणिसंग्रहालयात बर्ड फ्लूची लागण मांसाहारी प्राण्यांना होऊ नये यासाठी नियमावली तयार करून खबरदारी घेतली जात असल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.
अशी आहे प्राण्यांची स्थिती
n पालिकेच्या प्राणिसंग्रहालयात सध्या चार वाघ, चार बिबटे, दोन तरस आणि दोन कोल्हे असे मांसाहारी प्राणी आहेत.
n या प्राण्यांना दररोज ‘बफेलो मीट’ देण्यात येते. तर आठडय़ातून एकदा पिंवा दहा दिवसांनी चेंज म्हणून चिकन दिले जाते.
n मात्र कोंबडय़ांपासून होणाऱ्या ‘बर्ड फ्लू’चा अलर्ट आल्यामुळे चिकनचे खाद्य पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहे.
मास्क, सॅनिटायझेशन, फुटबाथ
मांसाहारी प्राण्यांच्या निवासाजवळ डय़ुटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामादरम्यान डय़ुटीव्यतिरिक्त कोणतीही मूव्हमेंट करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. डय़ुटीवर मास्क वापरणे, निवासाजवळ जाताना फुटबाथमध्ये पाय स्वच्छ करणे, जागा सॅनिटाइझ करणे आणि इतर डिसइन्फेक्टटेड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.