बायोमेडिकल कचऱ्याचा रस्त्यावर ढीग, कल्याणच्या वृंदावन रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार

रुग्णालयांमधून निर्माण होणारा बायोमेडिकल कचरा हा नागरी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतो. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. मात्र कल्याणमधील वृंदावन रुग्णालय बायोमेडिकल कचरा रस्त्यावर फेकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कचऱ्याच्य ढिगांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णालयच नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत कल्याण-डोंबिवली पालिकेने रुग्णालय प्रशासनाला 13 हजारांचा दंड ठोठावला आहे. केडी एमसी कडून सातत्याने सूचना देऊनही काही रुग्णालयांकडून बायोमेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वृंदावन रुग्णालयाकडून वापरलेली इंजेक्शन, आयव्ही बॉटल, काढलेले प्लास्टर, कापूस, बँडेज, वापरलेल्या आणि न वापरलेल्या सीरिंज असा अत्यंत धोकादायक कचरा रस्त्यावर टाकला होता. कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरात यामुळे दुर्गंधी पसरली होती. रात्रीच्या वेळी स्वच्छता मोहिमेदरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी हा प्रकार उघड केला. यामुळे वृंदावन रुग्णालयाला 13हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती केडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.

सर्व हॉस्पिटलची झाडाझडती

रुग्णालयीन कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी केडीएमसीने उंबर्डे येथील बायोमेडिकल वेस्ट प्लाण्टची व्यवस्था केली आहे. तरीही काही रुग्णालये बेजबाबदारपणे हा कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकत आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी केडीएमसीने पुन्हा एकदा सर्व रुग्णालयांना नोटीस बजावून बेजबादारपणा आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.