हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चौटाला यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

जननायक जनता पक्ष (जेजेपी)शी संबंधित असलेल्या एका बाईक शोरूम मालकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना हरियाणात घडली. रविंदर सैनी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हल्लेखोरांनी सैनी यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सैनी हे हरियाणाचे जेजेपी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे निकटवर्तीय होते.

बुधवारी संध्याकाळी 6 वाजता रविंदर सैनी फोनवर बोलत शोरूमबाहेर उभे होते. यावेळी आधीच शोरूमबाहेर दबून धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. जखमी रविंदर यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हत्येनंतर पोलीस अधीक्षक (एसपी) मकसूद अहमद यांनी सैनी यांचे सुरक्षा कर्मचारी जगदीप यांना निलंबित केले आणि त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्व आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्हीत कैद झालेला एक आरोपी सुमित हा रोहतक येथील रहिवासी आहे. मुख्य संशयित आरोपी विकी नेहरा हा सध्या हरियाणा तुरुंगात कैद आहे. 2017 मध्ये सैनी यांच्या शोरूममध्ये झालेल्या वादानंतर नेहराला तुरुंगवासाची शिक्षा झाली. यामुळे जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.