बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला, संपर्क क्रांती एक्स्प्रेस डबे सोडून इंजिन पळाले

देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरूच आहे. बिहारच्या समस्तीपुरमध्ये सोमवारी संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा भीषण अपघात सुदैवाने टळला आहे. दरभंगा येथून दिल्लीला जात असलेल्या बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस पूसा आणि कर्पुरीग्राम स्थानकांच्यामध्ये दोन भागात विभागली गेली. ट्रेनचे इंजिन दोन बोगींना घेऊन तब्बल शंभर मीटर पुढे पळाले आणि बाकीचे डब्बे मागेच राहिले. ही घटना कर्पुरीग्राम आणि पूसा स्टेशन दरम्यान रेपुरा गुमटी जवळ झाली आहे. कपलिंग तुटताच डब्यातील प्रवाशांना मोठा झटका बसला आणि घाबरलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

गाडीचे कपलिंग उघडल्याने आणि इंजिनसह दोन्ही बोगी वेगळ्या झाल्यामुळे जोरदार धक्का बसल्याचे ट्रेनमध्ये उपस्थित प्रवाशांनी सांगितले. यामुळे सर्वजण घाबरले. मात्र सुदैवाने आतापर्यंत कुठलीही हानी झालेली नाही. सुमारे शंभर मीटर पुढे गेल्यावर चालकाने इंजिन बंद केले. त्यानंतर कसेबसे इंजिन मागे घेऊन दुसरी बोगी जोडून गाडी संथ गतीने पुसा स्थानकात आणण्यात आली.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि ट्रेनच्या कपलिंगची पडताळणी सुरु केली आहे. सध्या 12.45 ही ट्रेन पूसा स्थानकावर थांबली होती. रेल्वेचे अनेक तांत्रिक अधिकारी पूसा स्थानकावर उपस्थित होते. मात्र अपघाताबाबत सांगण्यास टाळाटाळ करत होते. माध्यमांनी रेल्वेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी या अपघाताबाबत काही बोलण्यास नकार दिला. त्यांनी एवढेच सांगितले की, या अपघाताचा तपास सुरु असून त्यानंतर हा अपघात कसा झाला याबाबत बोलले जाऊ शकते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.