जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बिहार लोकसेवा आयोगाने त्यांना पाच पानी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांवर आयोगाने सात दिवसांत उत्तर मागितले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अलीकडेच प्रशांत किशोर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेत बिहार सरकारसह बिहार लोकसेवा आयोगाच्या कारभारावर सडकून टीका केली होती.
बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अधिकारी, शिक्षण माफिया आणि नेते सौदे करत आहेत. एका पदासाठी 3 लाख ते 1.5 कोटी आकारले जात आहेत. तसेच परीक्षेच्या माध्यमातून हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. याशिवाय सरकारी लोकच विद्यार्थ्यांना लुबाडत आहेत आणि बिहार लोकसेवा आयोगाच्या निम्म्याहून अधिक जागा विकल्या गेल्या आहेत, या आरोपांसाठी आयोगाने प्रशांत किशोर यांच्याकडे पुरावे मागितले आहेत.