मद्यधुंद डॉक्टरचा दोन मित्रांसोबत मिळून बलात्काराचा प्रयत्न, नर्सने कापलं गुप्तांग

कोलकातामध्ये आर जी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच देशभरातून अशा घटना समोर येत आहेत. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यामध्ये एका खासगी रुग्णालयात डॉक्टरने एका नर्सवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नर्सने मोठ्या धाडसाने नशेत असलेल्या डॉक्टरचे गुप्तांगच कापले. त्यानंतर नर्सने किंचाळत बाहेर धाव घेतली असता अन्य स्टाफ तिथे आला. त्या डॉक्टरसोबत त्याचे दोन मित्रही होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉक्टर आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे.

जिल्ह्यातील आरबीएस हेल्थ केअर हॉस्पीटलचे संचालक डॉक्टर संजय कुमार आपल्या दोन मित्रांसोबत हॉस्पिटलमध्येच होता. तिथे तो दोन साथीदारांसोबत दारू प्यायला आणि पुन्हा रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या नर्सजवळ गेला. नर्सला डॉक्टर नशेत असल्याचे लक्षात आल्यावर ती तिथून निघाली. मात्र त्या डॉक्टरने तिला रोखले. आरोपी डॉक्टर त्या नर्सवर बळजबरी करत होता. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिच्या कानशीलातही लगावली.

नर्स स्वत:चा बचाव करण्यासाठी झटापट करू लागली. तिने नशेत असलेल्या आरोपींना धक्का मारला आणि तिथे असलेल्या सर्जिकल ब्लेडने डॉक्टरच्या गुप्तांगावर वार केला. यात आरोपी डॉक्टर गंभीर जखमी झाला. त्याला पाहून त्याचे दोन्ही साथीदीरही घाबरले. दरम्यान. नर्स तिथून पळाली. पोलिसांनी पीडित नर्सचा जबाब घेण्याबरोबरच आरोपी डॉक्टर आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे. सध्या जखमी डॉक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित नर्स या रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून काम करत आहे. घटनास्थळावरुन दारुच्या बाटल्याही सापडल्या आहेत. घटनेपूर्वी आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते.