भाजीसाठी मोठा बटाटा घेतल्याने पतीला राग अनावर, कुऱ्हाडीने वार करत पत्नीची हत्या

भाजीसाठी मोठा बटाटा आणल्याच्या क्षुल्लक कारणातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. सोनी देवी असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

बिहारमधील मधुबन जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. सोनी देवीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला सहा महिन्यांचे मूल आहे. आरोपी दिल्लीत एका कंपनीत काम करत होता. भाजीसाठी मोठा बटाटा घेतल्याने पतीने पत्नीशी वाद घातला. पाहता पाहता वाद टोकाला गेला.

संतापाच्या भरात पतीने जवळ असलेली कुऱ्हाड घेतली आणि पत्नीवर सपासप वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

याप्रकरणी अन्य काही जणांनी पतीला मदत केली असून त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे.