आई गं..! टोलनाक्यावरील ट्रॅफिकमध्ये कार अडकली, गर्भवती महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू

टोलनाक्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला असे. मात्र बिहारमधील गोपालगंज येथे टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा फटका एका गर्भवती महिलेला बसला आहे. टोल प्लाझावरील ट्रॅफिकमध्ये कार अडकलेल्याने एका गर्भवतीच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी टोल प्लाझा कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बरहिमा गावातील गर्भवती महिला गरिमा पांडेय हिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. यामुळे कुटुंबीय तिला घेऊन खासगी कारने रुग्णालयात निघाले होते. मात्र टोल प्लाझावरील ट्रॅफिक जाममध्ये त्यांची कार अडकली. तासन्तास गाड्या एकाच जागेवर उभ्या राहिल्याने गरिमाला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला आणि बाळाचा पोटातच मृत्यू झाला.

प्रसूती वेदनेमुळे गरिमा कळवळत असताना कुटुंबीयांना टोल प्लाझा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांकडे मदतीची याचना केली. मात्र कुणालाही त्यांची दया आली नाही. ट्रॅफिकमुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला आणि बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. या प्रकरणी गरिमाचे नातेवाईक सोनू पांडेय यांनी टोल प्लाझा व्यवस्थापक राजीव कुमार शर्मा, कृष्ण मोहन मिश्रा आणि इतर कर्माचाऱ्यांविरुद्ध सिधवालिया पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही एफआयआर दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

ही घटना 4 जानेवारी रोजी घडली आहे. भावाच्या पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला घेऊन गोपाळगंजला निघालो होतो. टोल प्लाझाजवळ ट्रॅफिक जाम होते. आम्ही टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली, यावरून वादही झाला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने बाळाचा मृत्यू झाला, असे सोनू पांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या घटनेवर सगळ्यांनीच संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे एनएच-27 वर गेल्या महिन्यातच हा टोल प्लाझा सुरू झाला असून इथे कायमच ट्रॅफिक जाम असते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याने नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागते.