विशेष दर्जाची बिहारची मागणी केंद्र सरकारने फेटाळली

nitish-modi

बिहारला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, असे लोकसभेत सांगत केंद्र सरकारने बिहारमधील नितीश कुमार सरकारच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विशेष म्हणजे सध्याच्या भाजपप्रणित केंद्र सरकारला नितीश कुमार यांच्या जदयूचा टेकू असताना केंद्राकडून ही नकारघंटा वाजवण्यात आल्यामुळे राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी नितीश यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

जदयूचे खासदार रामप्रीत मंडल यांच्या प्रश्नावर संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 2012च्या अहवालाचा दाखला देत बिहार सरकारची मागणी फेटाळली. जदयूच्याच खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्राने स्पष्ट नकार दिल्यामुळे नितीश कुमार सपशेल तोंडघशी पडले आहेत. रामप्रीत मंडल हे बिहारच्या झांझारपूरचे जदयू खासदार आहेत. आर्थिक विकास आणि औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी बिहार आणि इतर सर्वात मागास राज्यांना विशेष दर्जा देण्याची सरकारची योजना आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तरात ही शक्यता फेटाळली.

लालू प्रसाद यांनी केली राजीनाम्याची मागणी

राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव आज नियमित तपासणीसाठी दिल्लीत पोहोचले असतानाच ही बातमी आली. यामुळे लालू यांनी लगेच नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बिहारला विशेष दर्जा देणार असल्याचे नितीश म्हणाले होते. आता केंद्रानेच ही मागणी नाकारल्यामुळे नितीश यांनी राजीनामा द्यायला हवा, असे ते म्हणाले. तर आम्हाला बिहारसाठी विशेष राज्याचा दर्जा आणि विशेष पॅकेज दोन्ही हवे आहे, असे आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज कुमार झा म्हणाले.